पिंपरी-चिंचवड : महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील रस्त्याच्या पाच कामामध्ये रिंग झाल्याचे प्रकरण विरोधकांनी उघडकीस आणले. त्यानंतरही महापालिकेचा पारदर्शक कारभार पाहणारे आयुक्त श्रावण हर्डिकर गप्प का? आहेत. हर्डिकराच्या कार्यकाळात रिंग झाल्याची अनेक प्रकरणे देवूनही त्यानी पुरावे द्या, कारवाई करतो, असे म्हणत वेळ मारुन कारवाईस चालढकल केली. त्यामुळे आता रिंगचे प्रकरण पुराव्यासह उघडकीस आल्याने श्रीमंत महापालिका ठेकेदार चालवित असून पिंपरी-चिंचवडचे अंबानी-अदाणी हे धंदा करुन एकदा महापालिका विकतील, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच महापालिका अधिकारी, ठेकेदार, सत्ताधारी नगरसेवक संगणमताने कारभार करीत असल्याने आयुक्तांची बदली करा आणि तुकाराम मुंडेना आणा, अशीही मागणी त्यांनी केली.
विरोधी पक्षनेत्यांचा घणाघात
यावेळी दत्ता साने म्हणाले की, श्रावण हर्डीकर हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त पदावर आल्यापासून अनेक कामे चुकीच्या पध्दतीने झाली आहेत. महापालिकेच्या अनेक कामांवर पुराव्यानिशी रिंग झाल्याचे कागदपत्रे देवूनही त्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले. महापालिका आयुक्तांसह सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी पारदर्शक कारभारांच्या नावाखाली श्रीमंत महापालिकेला भिकारी करण्याची वेळ आणली आहे. पिंपरी-चिंचवडच्या इथल्या अंबानी-अदाणी यांच्या धंद्याला आयु्क्तांनी बरकत दिली. आता महापालिका फक्त विकणे आहे अथवा भाड्याने देणे आहे, अशी वेळ भाजपच्या नेत्यांनी आणली आहे.
महापालिका होईल भिकारी
महापालिका आयुक्तांनी वारंवार आरोप होऊनही ते पारदर्शक आणि गतिमान कारभाराचा दाखला देत होते. मात्र, स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.12) झालेल्या बैठकीनंतर स्थापत्य विभागाच्या पाच रस्त्याच्या कामांमध्ये रिंग झाल्याचे पुराव्यानिशी उघड झाले आहे. आयुक्तांच्या कारकीर्दीला गालबोट लागून पालिकेचा कारभार चुकीच्या पध्दतीने सुरू असल्याचा शिक्कामोर्तब झाले आहे.
कारभाराला आयुक्त जबाबदार
महापालिकेच्या रिंगच्या कारभारामुळे श्रीमंत महापालिका भिखारी होवून लवकरच दिवाळे निघणार आहेत. या कारभाराला आयुक्त हर्डीकर जबाबदार असून आता त्यांची बदली होणे गरजेचे आहे. त्यांनी स्वत:हून बदली करून घ्यावी. अन्यथा राज्य सरकारने त्यांची बदली करावी. तसेच तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून पाठवावेत, अशी मागणी दत्ता साने यांनी केली. रिंगची बाब गंभीर असून त्या ठेकेदारांना दिलेल्या कामांची गुन्हे अन्वेशन विभागामार्फत चौकशी करावी. दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.