पुणे :- महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे डेक्कन जिमखाना येथील धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची दुरावस्था झाल्याचा आरोप करत आज (शुक्रवार) महापालिकेवर शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मोकाट यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून या कामात तातडीने लक्ष घालून हा विषय मार्गी लावण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराजांची जयंती व पुण्यतिथी असताना पुतळ्याची दुरावस्था झालेली दिसून आली. त्यामुळे त्याठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्याची काहीही व्यवस्था नाही. तसेच या स्मारकाचे सुशोभीकरणाचे कामही प्रलंबित आहे. सण 2007 मध्ये तत्कालीन आयुक्त खैरे आणि गरवारे रोप-वे कंपनी यांची एकत्रित बैठक होऊन या स्मारकाबाबतचा विकास आराखडा बनवण्यात आला होता. तसेच सुशोभीकरणाचा संपूर्ण खर्च गरवारे कंपनी करणार होती. मात्र, राजकीय हस्तक्षेप आणि महापालिकेचा हलगर्जीपणामुळे हे काम प्रलंबित असल्याचा आरोप मोकाट यांनी केला आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख महादेव बाबर, गटनेते संजय भोसले, महिला शहर संघटिका सविता मते, संगीत ठोसर आणि शिवसैनिक सहभागी होते.