महापालिकेविरोधात ठाणेकर एकवटले

0

ठाणे । ठाण्यातील नौपाडा येथील नीलकंठ टॉवरमधील रहिवाशी महापालिकेच्या विरोधात एकवटले आहेत. नौपाडा परिसरातील नीळकंठ टॉवर ही ठाण्यातील जुनी इमारत असून मूळ आराखड्यानुसार, या आवारात पार्किंगसाठी जागा देण्यात आली होती, मात्र, त्या ठिकाणी विकासकाने अनधिकृत गाळे बांधून विकल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केला आहे. या विरोधातील तक्रार, रहिवाशांनी महापालिकेकडे केली. त्या नुसार पालिकेने गाळे तोडले. मात्र, त्यानंतर गाळेमालकांनी गाळे दुरुस्तीसाठी पालिकेकडे अर्ज देऊन पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली. यानंतर रहिवाशांनी पुन्हा एकवार पालिकेकडे तक्रार केली.

आम्ही वारंवार पालिकेकडे तक्रार करत आहोत, पालिकेने एकदा अनधिकृत म्हणून पाडलेल्या एखाद्या रचनेला पुन्हा दुरुस्तीची परवानगी देणे हे चुकीचे आहे. मुळात ज्या रचना इथे अस्तित्वात नाही त्या परवानगी पालिका कशी देऊ शकते? असा सवाल नीलकंठ सोसायटीमधील रहिवासी माधुरी गुप्ते यांनी केला आहे. बुधवारी सकाळी या सर्व रहिवाशांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करून महापालिकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उभारले. त्याचबरोबर, यासंदर्भात गाळे मालक आणि त्यांचे गुंड रहिवाशांना धमकावत असल्याचा आरोपसुद्धा रहिवाशांनी केला. या जागेत दोन गाळे बांधण्यात आले होते, त्यावर कारवाई झाली. पण पुन्हा या ठिकाणी गाळे असल्याचा साक्षात्कार महापालिकेला झाला आणि त्यांनी दुरुस्तीची परवानगी इथे देऊ केली. पालिकेतील दोन विभागांचा एकमेकांशी समन्वय नसल्याचा हा प्रकार आहे, असा आरोप आशा देशपांडे यांनी केला आहे.