पुणे । ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग, विधवा महिला यांना पेन्शन सुरू न केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या मुख्यसभेत शिवसेनेने हा विषय लावून धरला. अखेर महापौर मुक्त टिळक यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना स्थयी समितीसमोर याबाबतचा सविस्तर प्रस्ताव ठेवण्याचे आदेश दिले.
नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर
ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग, विधवा महिला यांना महापालिकेकडून मानधन दिले जाते. महापालिका निवडणुकीपूर्वी विविध योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग, विधवा महिला यांना पेन्शन देण्यासाठी तब्बल 18 हजार अर्ज नोंदवून घेण्यात आले. मात्र, 8 महिन्यानंतरदेखील अर्जधारकांना कोणती ही पेन्शन देण्यात आली नाही. त्यामुळे अर्जदार नागरिक नगरसेवकांच्या कार्यालयात येऊन पेन्शन विषयी विचारणा करत असल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
महापौरांनी मागवला अहवाल
शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर वैशाली बनकर, वसंत मोरे, गोपाळ चिंताल, सुभाष जगताप या सभासदांनी देखील निधीची उपलब्धता करून लवकरात लवकर पेन्शन देण्याची मागणी केली. यावर महापौर मुक्ता टिळक यांनी आयुक्तांना याबाबत पुढील स्थयी समितीच्या बैठकी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.