मंत्रालयात बैठकीत खर्च कमी करण्याच्या सूचना
धुळे । मनपाने रोजंदारी व फंडातील 434 कर्मचार्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. त्याप्रश्नी बुधवारी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी मनपाला आस्थापना खर्च कमी करण्यासाठी उत्पन्नवाढीवर भर देण्याचे आदेश दिले आहेत. मनपाने जुलै 2017 या महिन्यात रोजंदारी व फंडातील एकूण 434 कर्मचार्यांना कायम करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविला होता. त्यात रोजंदारी कर्मचार्यांमध्ये 1993 पूर्वीचे 62, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रूजू झालेले 73 व उच्च न्यायालयाच्या आदेशाने रूजू झालेल्या 23 कर्मचार्यांसह अन्य कर्मचार्यांचा समावेश आहे.
महापालिकेचा आस्थापना खर्च सद्यस्थितीत 57 टक्के असल्यामुळे आकृतीबंध मंजूर असूनही पदभरती रखडली आहे. अशा परिस्थितीत 434 कर्मचार्यांना कायम कसे करणार? असा प्रश्न प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी उपस्थित केला आहे. मनपाने उत्पन्नवाढीसाठीच्या कार्यवाहीचा तपशिल सादर करावा, उत्पन्न किमान 10 कोटींनी वाढविण्याचे प्रयत्न करावे, असेही त्या म्हणाल्या. या बैठकीस आमदार अनिल गोटे, आयुक्त सुधाकर देशमुख, कार्यालय अधीक्षक नारायण सोनार, सुनिल देवरे, भानुदास बगदे उपस्थित होते.