पुणे : महापुरूषांना आणि त्यांच्या विचारांना कोणत्याही जाती-धर्मात न कोंडता स्वतःच्या जाती धर्मातील अनिष्ठ रुढी, प्रथांविरोधात उभे राहण्याची गरज आहे. साम्यवाद, समाजवाद आणि मानवतावादाची समाजाला गरज असून सर्व महापुरूषांच्या सतमुल्यांची गोळा बेरीज महाराष्ट्राला तारू शकेल, असे मत 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमंलनाचे अध्यक्ष आणि विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
गायक मिलींद शिंदे यांचा विशेष सत्कार
झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे दलित विकास आघाडी आणि कामगार सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आण्णाभाऊ साठ्ये यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित महाचर्चेच्या अध्यक्षस्थानावरुन सबनीस बोलत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठी राज्याचा उद्देश सफल झाला आहे का? या विषयावरील महाचर्चेत साहित्यिक रतनलाल सोनग्रा, प्रा. शिवाजी जवळगेकर, प्रविण बराथे सहभागी झाले होते. यावेळी व्यासपीठावर महाचर्चेचे स्वागताध्यक्ष आणि झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवान वैराट, भा. ल. ठाणगे उपस्थित होते. गायक मिलींद शिंदे आणि सुदाम पवार यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
पंतप्रधानांचे कार्य प्रशंसनीय
सबनीस म्हणाले, जाती धर्माच्या अतिरेकाने भारताचा इतिहास रक्तरंजीत झाला. पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्व जातीधर्माचे देशभक्त होते. त्यामुळे आपल्या देशाचे स्वातंत्र्य हे कोणा एका जातीधर्माच्या मालकीचे नसून सगळ्यांच्या हक्काचे आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान यांचा समाजवाद हा आंबेडकरांच्या राज्य समजावादाशी जोडणारा आहे. तो मानवतावादाशी संवाद साधणारा आहे. विद्रोही चळवळीतील वाढता एकांगीपण देशाला आणि राज्याला परवडणारा नाही, याची स्पष्ट जाणीव सध्याच्या पिढीने ठेवली पाहिजे. देशातील आणि राज्यातील विविधतेत संवाद साधून एकात्मता जपण्याची जबाबदारी सर्वांवर आहे. देशाचे सार्वभौमत्त्व टिकविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून जागतीक स्तरावर सूरु केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. पंतप्रधान हे कोणत्या पक्षाचे किंवा विचारधारेचे आहेत हे महत्त्वचे नसून त्यांनी जागतीक स्तरावार देशाच्या संरक्षणासाठी उभी केलेली तटबंदी महत्त्वाची आहे. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवान वैराट यांनी प्रास्ताविक केले, तर काशीनाथ गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.