महापुरुषांच्या नावाने असलेल्या सुट्ट्या रद्द

0

लखनऊ । उत्तर प्रदेश राज्याच्या निवडणूक निकालानंतर भाजपने योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. यानंतर योगी आदित्यनाथ यांनी वेगवेगळ्या निर्णयांचा धडाकाच लावल्याचे पहायला मिळत आहे. आता योगी आदित्यनाथ यांनी आणखीन एक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता उत्तर प्रदेश राज्यात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त तसेच पुण्यतिथीनिमित्त मिळणार्‍या सार्वजनिक सुट्ट्या यापुढील काळात बंद केल्या जाणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी या सुट्ट्या बंद करण्याचे सूतोवाच केले आहे. योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, आता महापुरुषांच्या नावाने मिळणार्‍या सार्वजनिक सुट्ट्यांची परंपरा बंद व्हायला हवी असं म्हणत या निर्णयामुळे काहींना आक्षेप असेल याची कल्पना आहे. परंतु, हे करणे आवश्यक आहे.

उत्तर प्रदेशात शाळांचे 220 शैक्षणिक दिवस अशा सुट्ट्यांमुळे 120 दिवसांचे झाले आहेत. अशीच परंपरा पुढे सुरू राहिली तर एक दिवस शाळेसाठी कोणताही दिवस शिल्लक राहणार नाही अशी भीती योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली.

उत्तर प्रदेशात राजकारणाच्या नावावर आतापर्यंत 42 सुट्ट्या घोषित करण्यात आल्या आहेत. यात 17 सुट्ट्या जातीय गणिते लक्षात ठेवूनच दिल्या गेल्यात. सुट्ट्यांबाबत विचार केला तर उत्तर प्रदेश देशात प्रथमस्थानी आहे. या घोषित दिवसांना 52 शनिवार आणि रविवार जोडले तर 146 दिवस शासकीय कार्यालये बंद राहतील. यात कर्मचार्‍यांना मिळणार्‍या 15 भरपगारी रजा आणि 14 कॅज्युअल लिव्ह मोजल्या, तर जवळजवळ 175 दिवस सुट्टी मिळते. यानुसार कर्मचार्‍यांना सुमारे 6 महिने कार्यालयात जाण्याची गरजच नाही. त्यामुळे ही परंपरा बंद करून महापुरुषांच्या जयंतीनिमित्त किंवा पुण्यतिथीनिमित्त विद्यालयांमध्ये त्या महापुरुषांच्या बद्दलचा एक किंवा दोन तासाचा एखादा कार्यक्रम घ्यावा त्यामुळे महापुरुषांविषयी माहितीही मिळेल, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.