पिंपरी-चिंचवड : शहरात महापुरुषांच्या पुतळ्याजवळ अतिक्रमण वाढत आहे. अतिक्रमण वाढल्याने परिसराचे विद्रुपीकरण होत असून सौंदर्याला बाधा येत आहे. त्यामुळे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याजवळील जागेला अतिक्रमण मुक्त करत शहर स्वच्छ करावे, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने महापालिकेकडे केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, कार्याध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, राष्ट्रीय महिला सरचिटणीस संजीवनी पांडे, शहर प्रवक्ता अशोक पारखी, शहर उपाध्यक्ष राजन बुडुख, अनंतराव कुलकर्णी, अॅड. अंतरा देशपांडे, नंदू भोगले आदी उपस्थित होते.
लोकमान्य, चापेकर बंधू पुतळ्याचे विद्रूपीकरण
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जुन्या प्रशासकीय इमारतीजवळ असलेल्या लोकमान्य टिळक पुतळ्याशेजारी अतिक्रमण वाढले आहे. मागील काही दिवसांपासून या ठिकाणी एक टपरी देखील उभी करण्यात आली आहे. तसेच चिंचवड गावातील चापेकर चौक येथे चापेकर बंधूंच्या पुतळ्याजवळ अतिक्रम वाढले आहे. त्यामुळे स्मारकाचे विद्रुपीकरण झाले आहे. महापालिका अतिक्रमण विरोधी प्रशासनाने यामध्ये तात्काळ लक्ष घालून परिसराला अतिक्रमणमुक्त करावे, अशी विनंती महासंघाने केली आहे.