भुसावळ । जगभरात जितकेही महापुरुष झालेत त्यांनी आपल्या आयुष्यात वाचनाला महत्व दिले. ज्याप्रमाणे शरीर सुदृढ होण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी वाचनाची आवश्यकता आहे. हिच बाब ओळखून महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्रंथवाचन करुन इतिहास घडविला. बाबासाहेबांनी तर आपल्या जीवनात वाचनालाच फार महत्व दिले आहे. ते म्हणत मला जर कुणी 1 रुपया दिला तर त्यातील 50 पैसे भाकरी व 50 पैसे पुस्तकावर खर्च करेल. कारण भाकरी शरीर जगवते तर पुस्तक जीवनात कस जगायच ते शिकविते, यासाठी बाबासाहेबांनी निरंतर वाचन करुन पाच हजार वर्षाचा गुलामगिरीचा इतिहास 50 वर्षात मिटविला हे केवळ पुस्तकांमुळेच शक्य झाले असल्याचे प्रतिपादन जेष्ठ कवि, साहित्यीक अशोक कोतवाल यांनी केले.
तीन दिवसीय व्याख्यानमाला
जय गणेश फाऊंडेशनतर्फे तीन दिवसीय ‘द्वारकाई’ व्याख्यान माला आयोजित करण्यात आली आहे. अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या सभागृहात व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफतांना ‘समृध्द जीवनासाठी वाचन’ या विषयावर अशोक कोतवाल बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे सचिव महेंद्र मांडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. गिरीष कुलकर्णी, सुलभा देशपांडे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, गणेश फेगडे, मुख्याध्यापिका प्राची देसाई उपस्थित होत्या. सुत्रसंचालन अरुण मांडाळकर यांनी केले.
बाबासाहेबांचा आदर्श बाळगा
साहित्य, क्रिडा, संशोधन अशा विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्यांनी वाचनावर भर दिला आहे. साधारण माणसे हे आपल्या निवार्यासाठी घरे बांधतात मात्र, बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी घर बांधले. त्यांच्याकडे 50 ते 60 हजार पुस्तके होती. यावरुनच बाबासाहेबांना वाचनाची किती आवड होती हे दिसून येते. पुर्वीच्या काळात स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, यावेळेस महिला आपले रक्षण करण्यासाठी सक्षम नसल्यामुळे त्यांना अबला म्हणून हिणवले जायचे मात्र महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच आज स्त्रिया या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. तसेच पुरुषप्रधान संस्कृती बदलवून स्त्रीप्रधान संस्कृती निर्माण करण्यासाठी मुलींनी देखील वाचनावर भर देण्याची आवश्यकता असल्याचेही कोतवाल यांनी सांगितले.
ग्रंथ हेच गुरु मानावे
याप्रसंगी पुढे बोलताना अशोक कोतवाल म्हणाले की, आई हा अतिशय पवित्र शब्द आहे. यात संपुर्ण विश्व सामावले आहे. हा शब्द वगळल्यास विश्वात काहीच शिल्लक राहत नाही. प्रत्येक गोष्टीचा जनक आहे. त्यामुळे आईचे महत्व हजारो वर्षांपासून वर्णन केले जात आहे. जीवनात तीन गुरु असतात आई, शिक्षक आणि ग्रंथ यातील दोन गुरु आपणास कालांतराने सोडून जातात मात्र ग्रंथ हे कायमस्वरुपी आपल्या सोबत राहतात. जगात महान झालेल्या थोर पुरुषांनी ग्रंथालाच महत्व दिले आहे.