महापुरुषांविषयी बदनामीकारक मजकूर पोस्ट करणार्‍यावर गुन्हा

0

चाकण : सोशल नेटवर्किंग साईटवर महापुरुषांविषयी बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी खराबवाडी (ता. खेड) येथील एका युवकाविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, म्हणून चाकण पोलिसांनी तातडीने शांतता समितीची बैठक घेऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, कुणीही सोशल मीडियावर कोणाचीही बदनामी होईल, असा मजकूर पोस्ट करू नये, आपल्याकडे आलेल्या कोणत्याही पोस्टची खात्री करावी, अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले. गैरप्रकार करणार्‍या संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारादेखील देण्यात आला.

संतप्त पडसाद उमटले
खराबवाडी येथील रहिवासी असलेल्या एका युवकाने खोडसाळपणा करत सोशल नेटवर्किंग साईटवर महापुरुषांविषयी बदनामीकारक मजकूर पोस्ट केला. या प्रकारामुळे लागलीच संतप्त पडसाद उमटले. मात्र, काही सुजाण नागरिक व चाकण पोलिसांनी लागलीच पुढाकार घेत सर्व नागरिकांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार चिघळू नये, यासाठी पोलिसांनी तात्काळ शांतता समितीची बैठक बोलावली. या बैठकीत शांततेचे आवाहन करण्यात आले. संबंधित युवकावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांनी दिले.

यांची होती उपस्थिती
शांतता समितीच्या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, प्रशांत पवार, शेखर कुलकर्णी, भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे संतोष जाधव, अशोक गोतारणे, राहुल गोतारणे, अभिजित घोगरे, नगरसेवक शेखर घोगरे, नितीन जगताप, अक्षय घोगरे, भीमशक्तीचे विकास खंडागळे उपस्थित होते.