लोणावळा : महापुरुषांची जयंती साजरी करताना डीजे किंवा फ्लेक्सबाजीच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने विचारांचे अनुयायी व्हावे. कारण त्यांचे विचार हेच जगातील सर्व समस्यांचे निरसन असून, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक आहे, असे मत एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनचे सचिव प्रा. सुभाष वारे यांनी व्यक्त केले. लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती शांतीदेवी गुप्ता वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वलवन यांच्यातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी लोणावळा एज्युजेशन ट्रस्टचे सचिव दत्तात्रय पाळेकर, उपप्राचार्य डॉ. जे. ओ. बच्छाव, डॉ. व्ही. ए. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. एन. पवार यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. संजय साळुंखे यांनी केले. प्रा. मल्हारी नागतीलक यांनी आभार मानले.
यावेळी प्रा. वारे म्हणाले, संविधान हे सर्व भारतीयांसाठी असून, बाबासाहेबांची भूमिका हि राष्ट्राच्या दृष्टीने व्यापक होती. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. आपले संविधान व राज्य घटनेमुळे सर्वधर्मीय भारताची लोकशाही जगातील सर्वोत्तम असून, याचे श्रेय हे बाबासाहेबांना जाते. तसेच बाबासाहेबांनी आयुष्यभर अन्यायाचा प्रतिकार हा संविधानिक अहिंसेच्या मार्गाने केला आहे. वैचारिक मतभेद हे वैचारिक मार्गानेच लढायचे असतात ही डॉ. बाबासाहेबांची विचारधारा होती.