धक्कातंत्राचा वापर होणार की पद भोसरीकडे राहणार याबद्दल मतदारसंघात उत्सुकता
राहुल जाधव यांची वर्णी लागण्याचे संकेत
पिंपरी : चर्होलीचे प्रतिनिधित्व करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर भोसरी मतदार संघातीलच ग्रामीण भागातील नगरसेवक महापौरपदावर बसणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या पदावर राहुल जाधव यांची वर्णी लागणार असल्याचे ‘संकेत’ आहेत. त्यामुळे भोसरी मतदार संघातील सलग दुसर्यांदा महापौर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष निवडीवेळी सत्ताधार्यांनी धक्कातंत्र अवलंबिले होते. त्यामुळे महापौरपदावेळी पण धक्कातंत्राचा वापर केला जातो की पद भोसरीकडे कायम राहणार याची जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर धक्कातंत्राचा वापर करत ऐनवेळी महापौरपदी नितीन काळजे यांची वर्णी लागली होती. त्यावेळी चिंचवड मतदार संघातील नगरसेवक नामदेव ढाके यांच्या नावाची महापौरपदासाठी जोरदार चर्चा होती. परंतु, ऐनवेळी काळजे यांचे नाव पुढे आले होते. त्यानंतर पहिले अडीच वर्षांचे महापौरपद भोसरी मतदार संघाकडे देण्याचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला आहे. तर, स्थायी समिती सभापतीपद चिंचवड मतदार संघाकडे आहे.
नेत्यांची वरिष्ठांकडे ‘फिल्डिंग’
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभार्यांनी सर्व नगरसेवकांना पंचवार्षिकमध्ये एक तरी पद देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार स्थायी समितीतील सदस्यांना एक वर्षांचाच कार्यकाळ देण्यात आला. आपला सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी (दि.17) आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक देखील जाहीर झाली आहे. मंगळवारी (दि.31) अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरण्यासाठी तीन दिवसच शिल्लक असल्याने शहरातील राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरु आहेत. आपल्या समर्थकाची महापौरपदी वर्णी लागावी यासाठी नेत्यांनी वरिष्ठांकडे ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.
तर काटेंकडे सभागृह नेतेपद
आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक नगरसेवक राहुल जाधव स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार होते. परंतु, ऐनवेळी चिंचवड मतदार संघातील ममता गायकवाड यांची स्थायी समिती अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यामुळे नाराज झालेल्या राहुल जाधव यांनी ‘स्थायी’ सदस्यत्वाचा, तसेच महापौर नितीन काळजे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला होता. जाधव यांना पद मिळण्यास आपली अडचण ठरत असल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यावेळी महापौरांनी सांगितले होते. त्यामुळे आता महापौरपदासाठी राहुल जाधव यांचे नाव अग्रस्थानी राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. जाधव यांच्यासोबतच संतोष लोंढे, चिंचवड मतदार संघातील शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम आणि नामदेव ढाके यांची नावे महापौरपदासाठी चर्चेत आहेत. महापौरपदी जाधव यांची निवड झाल्यास सभागृह नेतेपद शत्रुघ्न काटे यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे, भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
महापालिकेतील पदांचे वाटप
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक मानले जात असलेल्या ममता गायकवाड यांच्या रुपाने सर्वांत महत्वाचे स्थायी समिती अध्यक्षपद चिंचवड मतदार संघाकडे आहे. तसेच विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौघुले आणि जैव विविधता व व्यवस्थापन समितीच्या सभापती उषा मुंढे या चिंचवड मतदार संघातील आहेत. तर, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती संजय नेवाळे, शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे भोसरी मतदार संघातील असून हे पदाधिकारी आमदार महेश लांडगे यांचे समर्थक आहेत. दरम्यान, भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांना समाविष्ट गावातून मोठे मताधिक्य मिळाले होते. त्याची परतफेड म्हणून त्यांनी समाविष्ट गावातील नगरसेवकाला महापौर केले. महापौर नितीन काळजे यांनी देखील पदाचा पुरेपुर लाभ उचलत चर्होलीचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला.