पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्ता स्थापन करणार्या भारतीय जनता पक्षाने महापौरपदी नितीन काळजे यांना तर उपमहापौरपदी शैलजा मोरे यांना संधी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौरपदासाठी नितीन काळजे, उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे काळजे हे भाजपचे पहिले महापौर ठरणार आहेत. तसेच सत्तारुढ पक्षनेतेपदापाठोपाठ महापौरपदही भोसरी विधानसभा मतदारसंघाला मिळाले आहे. आता मंगळवारी (दि.14) महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीची केवळ औपचारिकता पार पाडली जाणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही महापौरपदासाठी श्याम लांडे आणि उपमहापौरपदासाठी निकिता कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, सभागृह नेत्या मंगला कदम, डब्बू आसवानी, नगरसेविका वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे, उषा वाघेरे आदींची उपस्थिती होती. महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होईल, असे वाटले होते. परंतु, राष्ट्रवादीही महापौर-उपमहापौरपदासाठी रिंगणात उतरल्याने चुरस निर्माण झाली आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे तर राष्ट्रवादीकडे बहुमत नाही. तरीही राष्ट्रवादी काय खेळी करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
पक्षनेते पदापाठोपाठ महापौरपदही भोसरीलाच!
महापालिका निवडणुकीत भाजपने 128 पैकी 77 जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला धोबीपछाड देत भाजपने महापालिकेत प्रथमच कमळ फुलविले. त्यामुळे भाजपचे पहिले महापौरपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महापौरपदासाठी ज्येष्ठ कामगार नेते नामदेव ढाके, संतोष लोंढे, वसंत बोर्हाटे, शत्रुघ्न काटे आणि नितीन काळजे यांची नावे सर्वाधिक चर्चेत होती. काटे आणि ढाके हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील, तर काळजे, लोंढे आणि बोर्हाटे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. या पाच जणांपैकी कोणाला महापौरपद मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. भाजपकडून मूळ ओबीसी तसेच पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यालाच हे पद मिळेल असे सांगितले जात होते. परंतु, दिवसभराच्या ताणाताणीनंतर महापौरपदासाठी भाजपकडून नितीन काळजे यांनी तर उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सभागृह नेते एकनाथ पवार, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, बाबू नायर आदी उपस्थित होते. सत्तारुढ पक्षनेतेपदापाठोपाठ महापौरपदही भोसरी विधानसभा मतदारसंघाला मिळाल्याने शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांचा गट काहीसा नाराज असल्याचे यावेळी दिसून आले. तर पदे वाटपात भोसरीचे आ. महेश लांडगे यांचा वरचष्मा दिसून आला आहे.
महापौर निवडणुकीची केवळ औपचारिकता?
महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारी (दि. 9) शेवटचा दिवस होता. दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरण्याची मुदत होती. महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे महापौर आणि उपमहापौरदाची नावे एक दिवस आधीच जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र सत्ता संघर्षामुळे भाजपच्या वरिष्ठांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या दोन्ही पदासाठी नावे जाहीर करण्यास विलंब केला. अर्ज भरण्याच्या काही मिनिटे आधी महापौरपदासाठी नितीन काळजे, तर उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यानंतर काळजे आणि मोरे या दोघांनीही महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. त्यामुळे नितीन काळजे यांची महापौरपदी, तर शैलजा मोरे यांची उपमहापौरपदी निवड निश्चित आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीसाठी येत्या 14 मार्चरोजी निवडणुकीची केवळ औपचारिकता पार पाडावी लागणार आहे. नितीन काळजे यांना महापौरपद मिळाल्यामुळे हे पद भोसरी विधानसभा मतदारसंघाला मिळाले आहे, तर मोरे यांच्या रुपाने पिंपरी विधानसभा मतदारसंघाला उपमहापौरपद मिळाले आहे. काळजे हे मूळ ओबीसी नसल्याचा आक्षेपही यावेळी अनेकांनी घेतला होता. त्यावर पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही अनेक कार्यकर्ते तीव्र नाराजी व्यक्त करत होते.
राष्ट्रवादी काय चमत्कार घडविणार?
दरम्यान, महापौर-उपमहापौरपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसही उतरली आहे. राष्ट्रवादीकडून श्याम लांडे आणि निकिता कदम यांनी महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. येत्या 14 मार्चरोजी सकाळी 11 वाजता या दोन्ही पदांसाठी महापालिकेच्या सभागृहात निवडणूक होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. राष्ट्रवादीकडे बहुमत नसतानाही त्यांनी उमेदवार दिल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काही चमत्कार करते की काय? अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे. तथापि, अशा काहीही चमत्काराची शक्यता तूर्त तरी नाही. राष्ट्रवादीच्या 36 जागा असून, शिवसेनेच्या 9 जागा आहेत तर इतर सहा नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपचा एक गट फोडला तरच राष्ट्रवादीचे महापौरपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.