औरंगाबाद : नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडण्याचा भाजपला काही प्रमाणात फायदा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क आणि ड श्रेणीच्या महानगरपालिकांचे महापौर थेट जनतेच्या मतांद्वारे निवडण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. ते औरंगाबाद येथे बोलत होते. महापौर जनतेमधून निवडण्याच्या प्रस्तावावर अभ्यास करुन निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता हवी!
अखिल भारतीय महापौर परिषदेची 109वी बैठक औरंगाबाद येथे पार पडली. या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी क आणि ड श्रेणीच्या शहरांमध्ये जनमताने महापौर निवडण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे सांगितले. मोठ्या शहरांमध्ये थेट जनमताने महापौर निवडणे शक्य नाही, असेही ते म्हणाले. शहरीकरणाचा वेग वाढत आहे. शहरांपुढे मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याचे मोठे आव्हान आहे. शहरांना विकासाकरिता निधीची आवश्यकता आहे. विकासकामांमध्ये गुंतवणूक करण्यास अनेक संस्था तयार आहेत. मात्र महानगरपालिकेचा अर्थसंकल्प विकासाच्या आराखड्याला अनुसरुन हवा. महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता हवी, असे सांगून, शहरांच्या विकासासाठी महापौरांनी राजकीय ताकद उभी करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.