आरोग्य विभाग रडारवर ः शहरात सुरू झाल्या घंटागाड्या
जळगाव : शहराची साफसफाई आणि कचरा संकलनाचा ठेका ऑगस्ट 2019 पासून वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. मक्ता दिल्यापासूनच त्याच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. शहरात अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग साचले असताना देखील तो शहराची योग्य पद्धतीने साफसफाई करत नव्हता. गेल्या पंधरा दिवसापासून तर शहरात एकही वाहन साफसफाईसाठी फिरत नसल्याने आरोग्याची मोठी समस्या उभी राहिली होती. तिसर्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मक्तेदार दबंगगीरी करीत असल्याने मनपा प्रशासनाचे प्रयत्न तोडके पडत असल्याचे महापौर भारती सोनवणे यांच्या लक्षात आले. महापौरांनी शनिवारी अचानक पाहणी करून वॉटरग्रेस कंपनीच्या प्रतिनिधींची चांगलीची खरडपट्टी काढली.
पहाटे केली पाहणी, सर्व कारभार आलबेल
महापौर भारती सोनवणे यांनी शनिवारी पहाटे 5.30 वाजताच टी.बी.सनेटोरियम रुग्णालय गाठले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, चेतन सनकत, किशोर चौधरी, भरत सपकाळे, प्रशांत नाईक, नवनाथ दारकुंडे, उपायुक्त मिनीनाथ दंडवते, आरोग्यधिकारी पवन पाटील देखील उपस्थित होते. दिवस उजाडला तरी त्याठिकाणी काही मोजकेच वाहनचालक उपस्थित होते. स्वच्छतेच्या कामात आडमुठेपणा करणार्या वॉटरग्रेसच्या प्रतिनिधीला तात्काळ बोलविण्याच्या सूचना महापौरांनी केल्या. सर्व कारभाराची महापौर भारती सोनवणे यांनी माहिती घेतली असता वॉटरग्रेसचा सर्वच कारभार आलबेल असल्याचे लक्षात आले. वॉटरग्रेस मक्तेदाराचे प्रतिनिधी विशाल सकट यांच्याशी वारंवार संपर्क साधून देखील ते येत नसल्याने महापौर भारती सोनवणेंचा संताप अनावर झाला.
वॉटरग्रेसच्या प्रतिनिधीकडून वाहनांच्या चाव्या परत घेतल्यानंतर महापौर भारती सोनवणे यांनी तात्काळ सर्व चालकांना घंटागाड्या घेऊन रवाना केल्या. शनिवारी जळगावच्या रस्त्यावर 64 घंटा गाड्या, 5 डंपर, 12 ट्रॅक्टर, 6 कॉम्प्रकटर, 1 स्कीप लोडर, 3 लोडर स्वच्छतेसाठी कार्यरत होते. दिवसभरात सकाळ सत्रात 190 टन आणि दुपारी 50 टन कचरा संकलीत करण्यात आला. दरम्यान, नादुरुस्त असलेल्या 13 घंटागाड्या, 2 स्कीप लोडर, 1 लोडर आणि 1 कॉम्पॅक्टर त्वरित दुरुस्तीकामी पाठविण्यात आले असून दोन दिवसात ते देखील रस्त्यावर उतरणार आहे.