महापौरांचा गांव – गांवठाण स्वच्छता पाहणी दौरा

0

नवी मुंबई । ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका देशात प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त करण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून काम करीत असून यामध्ये महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधीही पूर्ण क्षमतेने तयारीला लागले आहेत. यादृष्टीने ग्रामीण भागातील स्वच्छता कामांचा आढावा घेत महापौर जयवंत सुतार यांनी सभागृह नेते रविंद्र इथापे यांच्यासह महापालिका क्षेत्रातील करावे, दारावे, नेरूळ या गावांना व गावठाण क्षेत्रांना भेटी देऊन तेथील स्वच्छता व अनुषांगिक कामांची पाहणी केली. या पाहणी दौ-याप्रसंगी त्यांच्या समवेत नगरसेवक विनोद म्हात्रे, सलुजा सुतार, गणेश म्हात्रे, गिरीश म्हात्रे त्यांच्या प्रभागातील पाहणी प्रसंगी उपस्थित होते.

सकारात्मक उत्तरे द्यावीत असेही आवाहन
या पाहणी दौ-यात महापौर महोदयांनी गाव – गावठाण भागातील साफसफाईत अधिक वाढ करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी वर्गास दिल्या तसेच गावातील नागरिकांनीही आपल्या घरातच ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवून कचरा गाडीमध्येही वेगवेगळा द्यावा असे आवाहन केले. नवी मुंबई शहराचे स्वरूप मागील वर्षीपेक्षा यावर्षी अधिक स्वच्छ व सुंदर दिसत असून नागरिकांच्या सहभागाशिवाय त्याला पूर्णत्व येणे शक्य नाही हे जाणून प्रत्येक नागरिकाने आपला कचरा ही आपली जबाबदारी मानून शहर स्वच्छतेत पुढाकार घ्यावा, आपल्यामुळे कुठेही कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी, शौचालयांचा वापर करावा तसेच प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळून कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन केले. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहरातील कोणत्याही नागरिकाला केंद्रीय पाहणी समितीमार्फत विचारल्या जाणा-या शहर स्वच्छतेविषयी विचारल्या जाणा-या प्रश्‍नांची शहराचे बदललेले स्वच्छ रूप पाहून सकारात्मक उत्तरे द्यावीत असेही आवाहन महापौर जयवंत सुतार यांनी केले.