नागरी हक्क सुरक्षा समितीची उपरोधिक मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांना गड- किल्ल्यांची नावे दिली आहेत. त्यानुसार ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या इमारतीला रायगड हे नाव देण्यात आले आहे. मात्र रायगड ही स्वराज्याची राजधानी असल्याने हे नाव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला द्यावे, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच महापौरांना ‘छत्रपती’, स्थायी समिती अध्यक्षांना ‘सेनापती’ आणि प्रभाग अध्यक्षांना ‘सुभेदार’ म्हणा, अशी उपरोधिक मागणी देखील त्यांनी केली आहे. या मागणीबाबतचे निवेदन नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आठ क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामुळे महापालिका प्रशासन सर्व नागरिकांच्या अभिनंदनास पात्र आहे. महापालिका मुख्य इमारतीसह प्रभाग कार्यालयांना देखील विविध गड-किल्ल्यांची नावे दिल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात राहत असल्याचा आनंद मिळेल. ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या इमारतीला दिलेले रायगड हे नाव बदलून दुसर्या नामांकित गडाचे अथवा किल्ल्याचे नाव देण्यात यावे. रायगड ही राज्याची राजधानी होती. दुसरे कोणतेही नाव दिले तरी हरकत नाही, पण रायगड हे नाव नको.
महापौरपदाचे नामकरण छत्रपती करावे
या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग अध्यक्षांचे नामकरण ‘सुभेदार’ असे करावे, प्रभागांना ‘प्रभाग’ ऐवजी ‘सुभा’ असे संबोधण्यात यावे. (उदा. तोरणा सुभा, पुरंदर सुभा) महापौरपदाचे नामकरण ‘छत्रपती’ व स्थायी समिती अध्यक्षांचे नामकरण ‘सेनापती’ असे करावे. सर्व नगरसेवकांना ‘सरदार’ असे संबोधण्यात यावे. जेणेकरून छत्रपती शिवरायांच्या प्रत्यक्ष सहवासाचा अनुभव सर्व नगर सदस्यांना, अधिकार्यांना आणि कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिकांनाही अनुभवता येईल. राज्यामध्ये सत्तेत असलेले सरकार हे ‘छत्रपतींच्या आशीर्वादाने’ सत्तेत आल्याचा दावा मुख्यमंत्री नेहमी करतात. मात्र आपण त्यांच्याही पुढे जाऊन ‘प्रत्यक्ष छत्रपतींचेच राज्य’ प्रत्यक्षात अस्तित्वात आणावे असे, आवाहन नागरी हक्क सुरक्षा समितीने केले आहे.
निवेदनावर समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, युवाध्यक्ष प्रदीप पवार, उपाध्यक्ष दिलीप काकडे, सदस्य उमेश इनामदार, गिरिधारी लढ्ढा, प्रताप लोके यांच्या स्वाक्षर्या आहेत.