थेट मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्याकडे केला पत्रव्यवहार
भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक यांनी वेधले लक्ष
पिंपरी-चिंचवड : शहरातील विविध समस्यांबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत असताना महापौरांच्या प्रभागातील समस्यांबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक यांनी मुख्यमंत्र्यांसह, महसूल मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे या समस्यांकडे लक्ष वेधले आहे.
चर्होलीतील नागरिकरणात वाढ
मोळक यांनी निवेदनात म्हटले आहे की, चर्होली बुद्रुकमध्ये मोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. त्यामुळे येथील नागरीकरणात वाढ होत आहे. त्यामुळे येथील समस्या वेळेत मार्गी लागाव्यात यासाठी स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करतात; पण त्यांच्या तक्रारींना दाद लागत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. येथील एका 1260 सदनिकांच्या गृहप्रकल्पाजवळ मुख्य रस्त्याचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. येथे सध्या 900 कुटुंबीय राहतात.
आयुक्तांची भेट
डांबरी रस्ता नसल्याने येथून ये-जा करणार्यांचे अपघात होऊन गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या ’सारथी’ हेल्पलाईनकडे सुरवातीला तक्रार केली होती. पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे या नागरिकांनी भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक यांच्यामार्फत आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन तक्रार केली आहे.
पथदिवे नसल्याने गंभीर गुन्ह्यांची शक्यता
येथे राहणारे बहुतांश लोक हे आयटी क्षेत्रात काम करणारे आहेत. शिफ्ट ड्युटीमुळे या लोकांना रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो. रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने वीज वितरणाकडून पथदिव्यांचे काम झालेले नाही. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आल्याचे स्थानिक सांगतात. गंभीर गुन्हे घडण्याची वाट प्रशासन बघत आहे का, असा संतप्त सवाल स्थानिक करत आहेत.
असुविधांसाठी कोट्यवधीचा कर
या भागातील नागरिक वर्षाला कोट्यवधींचा कर भरतात. त्यामुळे येथे नागरी सुविधा चांगल्या असाव्यात या माफक अपेक्षा आहेत. त्यासाठी या लोकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली; पण रस्त्यांची, लाईटची समस्या अद्याप मिटलेली नाही. पालकमंत्र्यांची देखील या लोकांची भेट घडवून आणली. त्यानंतर या नागरिकांच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांकडे येथील समस्यांचा निपटारा व्हावा यासाठी पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती भाजपच्या महिलाध्यक्षा शैला मोळक यांनी दिली.