महापौरांच्या अधिकारांना ‘स्थायी’ समितीचे आव्हान!

0

स्थायीने दाखविला अविश्‍वास

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील आमदार गटातील कुरघोड्यांचा फटका आता महापालिकेतील प्रशासकीय अधिकार्‍यांनाही बसू लागला आहे. महापालिकेच्या कार्यक्रमाची रुपरेषा, निमंत्रण पत्रिका, विविध कार्यक्रम ठरविण्याच्या अधिकार महापौरांकडे असतात. परंतु, स्थायी समितीने महापौरांवर अविश्‍वास दाखविला आहे. वाकड, पुनावळे येथील विकासकामांच्या भुमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण महापालिकेने कार्यालयीन वेळ संपल्यानंतर 10 मिनिटे उशिरा ई-मेलद्वारे दिल्याचे ‘फुटकळ’ कारण पुढे करत याची चौकशी करण्यात यावी, असा ठराव स्थायी समितीच्या सभेत केला आहे. असा ठराव करुन स्थायी समितीने महापौरांच्या अधिकारांना आव्हान दिले असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

महापालिकेतील महापौर हे सर्वोच्च पद आहे. महापौरांच्या सूचनेनुसार पालिकेच्या कार्यक्रमांची रुपरेषा, निमंत्रण पत्रिका, विविध कार्यक्रमाचे भुमिपूजन, उद्घाटने करण्याचे निश्‍चित केले जाते. उद्घाटन, भुमिपूजन कोणाच्या हस्ते करण्यात यावे, हे ठरविण्याचा अधिकार महापौरांचा आहे. त्यानुसार महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते 24 मे रोजी प्रभाग क्रमांक 25 वाकड, पुनावळे या प्रभागातील एकूण सहा कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामध्ये वाकड-ताथवडे येथील 24 व 18 मीटर रुंद रस्त्याचे आणि पुनावळे येथील अमृत योजनेतील उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची कोणत्याही प्रकारची निमंत्रण पत्रिका छापण्यात आली नव्हती. या प्रभागातून शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह शिवसेनेच्या चिन्हावर अश्‍विनी वाघमारे, रेखा दर्शिले आणि राष्ट्रवादीचे मयुर कलाटे निवडून आले आहेत. या चारही नगरसेवकांच्या उपस्थितीत कामांचे भुमिपूजन महापौरांच्या हस्ते करण्यात आले. नेमकी हीच बाब भाजपच्या स्थानिक नेत्यांना खटकली आहे.

चौकशी करण्याचा ठराव
यामुळे विकासकामांचे भूमिपुजन कार्यक्रमाची चौकशी करण्याचा ठराव स्थायी समितीमध्ये केला आहे. या ठरावावर सूचक म्हणून नगरसेवक विलास मडिगेरी यांनी तर अनुमोदक म्हणून साधना मळेकर यांनी स्वाक्षरी केली आहे. जनता संपर्क विभागाच्या सहायक आयुक्तांनी 23 मे रोजी सायंकाळी महापालिका कार्यालयीन वेळ संपल्यानंतर पाच वाजून 49 मिनिटे आणि 33 सेकंदांनी सर्व संबंधित विभागांना ई-मेलद्वारे कळविले. सहायक आयुक्तांनी जाणूनबुजून मनमानी करुन शिष्टाचाराचा भंग केलेला आहे.

चिंचवडमध्ये केले उद्घाटन
दरम्यान, महापौर नितीन काळजे हे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी चिंचवड मतदार संघातून जाऊन विकासकामांचे उद्घाटन केल्याचा राग स्थानिक भाजपच्या नेत्यांना आला आहे. तसेच शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी शहरातील अनधिकृत बांधकाबाबत प्रश्‍न विचारले आहेत. त्यांचे प्रश्‍नही महापौरांनी स्वीकारले. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामाचे भयाण वास्तव समोर आले आहे. यामुळे भाजपचा स्थानिक नेता भयंकार चिडला आहे. त्यातूनच या कार्यक्रमाची चौकशी करण्यात येत आहे.