पुणे : पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांचे जातप्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते मृणाल ढोले-पाटील व घनश्याम खेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केला. त्यासाठी त्यांनी काळजे यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यासह इतर कागदपत्रेही सादर केली. याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली असता, न्यायालयाने नव्याने जातपडताळणीचे आदेश दिले होते. त्यानुसार, हे प्रकरण जातपडताळणी समिती, पुणे यांच्याकडे आले आहे. काळजे यांनी खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवले असल्याचा आरोप करून, जातपडताळणी समितीने कोणत्याही परिस्थितीत त्यांना पडताळणी प्रमाणपत्र देऊ नये, अन्यथा पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली जाईल, असा इशाराही या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, काळजे यांचे जातप्रमाणपत्र खोटे ठरले तर त्यांचे महापौरपद जाऊ शकते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत राजकीय भूकंप होण्याची शक्यताही राजकीय सूत्राने व्यक्त केली आहे.
काळजेंनी त्वरित राजीनामा द्यावा!
पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर नितीन काळजे यांचे वडील, आजोबा, पणजोबा, चुलते, चुलत भाऊ या सर्वांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जात नोंद ’हिंदू -मराठा’ असताना ते ओबीसी कसे? असा प्रश्न विचारत मृणाल ढोले-पाटील आणि घनश्याम खेडकर यांनी काळजेंचा जातीचा दावा खोटा आहे, असे सांगत त्यांनी त्वरीत राजीनामा देण्याची मागणीही यावेळी पत्रकार परिषदेत केली. यावेळी खेडकर यांनी पुरावा म्हणून काळजे यांच्यासह, त्यांच्या वडिलांचा आणि आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला दाखविला. या सर्वांच्या दाखल्यावर हिंदू-मराठा अशी नोंद आहे. हे सर्व पुरावे जातपडताळणी समितीमोर सादर केल्याचे त्यांनी सांगितले. काळजे हे सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांना वाचविण्यासाठी समितीच्या कामकाजामध्ये राजकीय हस्तक्षेप केला जाण्याची शक्यता खेडकर यांनी यावेळी व्यक्त केली. या लढाईत निकाल जर विरोधात गेला तर क्षणाचाही विलंब न करता उच्च न्यायालयात धाव घेणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जातपडताळणी समितीवर राजकीय दबावाची शक्यता!
घनश्याम खेडकर म्हणाले की, आम्हीही त्याच गावात राहतो व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला पूर्वापार पिढीजात ओळखतो, त्यांचे रोटीबेटी व्यवहार बघतो, लग्न समारंभात भाग घेतो, गावात काळजे कुटुंबीय हे 96 कुळी मराठा म्हणूनच ओळखले जातात, मग हा समज चुकीचा आहे का? मग गावात वावरताना उच्चवर्णीय म्हणून वावरायचे व आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी फक्त मागासलेले आहे, असे दाखवायचे हे वागणे चुकीचे व इतर समाजावर अन्याय करणारे आहे. 3 ऑगस्टरोजी या प्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण झाली असून, काही दिवसात याप्रकरणी निकाल लागणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी जातपडताळणी समितीवर राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सत्य बाहेर येण्यासाठी जातपडताळणी समितीसमोर सादर केलेले काही पुरावे आम्ही माध्यमांसमोर मांडत आहोत, अशी माहिती मृणाल ढोले यांनी दिली.
सरकारजमा कागदपत्रे झाली गहाळ
माहिती अधिकार कार्यकर्ते मृणाल ढोले-पाटील म्हणाले, मूळ जातप्रमाणपत्रावर सही तत्कालीन उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल यांची आहे. सहीमध्येही तफावत दिसत आहे. शिक्का हा दुसर्याच अधिकार्याचा आहे. कार्यालयीन रजिस्टारमध्ये नोंद देणार्या अधिकार्याचे नाव भालदार आहे. नाव एकाचे, सही दुसर्याची व शिक्का तिसर्याचा आहे. तसेच, जातदाखला वितरित केल्याची तारीख, जात व श्रेणी रजिस्टरमध्ये नोंद नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, सरकारी दप्तरातून याबाबतची सर्व मूळ कागदपत्रे गहाळ झालेली आहेत. मूळ जातप्रमाणपत्रावर तपासलेल्या कागदपत्रांची नोंद असते. या दाखल्यावर तशीही नोंद नाही. वंशावळदेखील संशयास्पद असून, शपथपत्रावर दिलेल्या वंशावळीत सख्खे भाऊ, चुलत भाऊ व चुलते यांची नोंद नाही, अशी माहितीही ढोले-पाटील यांनी दिली.