महापौरांच्या दिमतीला आता आली लाल दिव्याची गाडी

0

धुळे : शहराच्या महापौर कल्पना महाले यांच्या गाडीवर लाल दिवा लावण्यात आला आहे. त्याबाबतची अनुमती परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांनी दिली आहे. महापौर कल्पना महालेंच्या वाहनावर लाल दिवा झळकला जाणार असून त्याची पूर्तता करण्यात आली असल्याचे मनपा सूत्रांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने १७ ऑगस्ट २०१३ रोजीच्या परिपत्रकाद्वारे ‘क’ आणि ‘ड’ वर्ग महानगर पालिकाच्या महापौरांना वाहनावर लाल अथवा अंबरदिवा लावण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. त्यापूर्वी मात्र असा दिवा लावला जात होता.

महापौरांच्या पदाचा सन्मान राखला जावा म्हणून महाराष्ट्र महापौर परिषदेच्यावतीने एक ठराव पारित करुन तो मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांच्याकडे सादर करण्यात आला. ९ डिसेंबर २०१६ रोजी मिराभाईंदर येथे महापौर परिषदेची बैठक झाली. तिच्या अध्यक्षस्थानी बृहन्मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर होत्या. त्यांनी परिवहन मंत्र्यांनी क, ड, वर्ग पालिकांच्या महापौरांना त्यांच्या वाहनावर लाल किंवा अंबर दिवा लावण्यास मान्यता दिली आहे असा निर्वाळा दिला. त्यानुसार आता धुळ्याच्या महापौर कल्पना महाले यांच्या वाहन क्र. एम. एच. १८/ए. एन. ९५९५ वर लाल दिवा लावण्यात आला आहे.