पिंपरी-चिंचवड : महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांना अखेर नवीन मोटार मिळणार आहे. त्यांच्यासाठी नवीन टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ही मोटार खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी येणार्या 15 लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. महापौर काळजे यांना सरकारी मोटार देण्यात आली होती. परंतु, ती मोटार वारंवार नादुरुस्त होत होती. महापौरांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. काही दिवसांपूर्वी एका खासगी कार्यक्रमाला गेले असताना रस्त्यामध्येच त्यांची मोटार बंद पडली होती. त्यामुळे महापौरांना एक दिवस पालिकेत येता आले नव्हते.
खासगी मोटारीचा वापर
महापौर काळजे यांनी खासगी मोटार वापरण्यास सुरुवात केली होती. आपण स्वत: नवीन मोटार मागणार नाही. प्रशासनाला वाटल्यास त्यांनी नवीन मोटार द्यावी, अशी भूमिका महापौरांनी घेतली होती. तसेच प्रशासन मोटार देण्यास विलंब करत असल्यामुळे त्यांनी खंतदेखील व्यक्त केली होती. मोटारीचा इंधनाचा दैनंदिन खर्च दोन ते अडीच हजार रुपये येत असून इंधनाचा एवढा खर्च कोठून आणायचा, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला होता.
खर्चास मंजुरी
अखेर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापौरांसाठी नवीन मोटार खरेदी करण्याचा ऐनवेळचा प्रस्ताव मांडला. मोटार खरेदीच्या 12 लाख 39 हजार 83 रुपये आणि इतर साहित्यासाठी दोन लाख 6 हजार अशा 15 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. नियामाप्रमाणे महापौरांसाठी 15 लाख रुपयांपर्यंत मोटार खरेदी करण्यात येणार आहे.