पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांच्या प्रभाग क्रमांक तीन च-होली, मोशी गावठाण प्रभागातील रस्ते, आरक्षणे विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. महापालिकेच्या तांत्रिक सल्लागार नेमणुकीच्या समितीची २४ एप्रिल २०१८ रोजी शहर अभियंत्याच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत मे.नियोजन कन्सल्टंट यांनी च-होली येथील सर्व्हे क्रमांक १३१ येथील आयटुआरच्या बदल्यात ताब्यात आलेल्या महापालिकेच्या जागेवरील जलतरण तलावाची स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत.
आरक्षण क्रमांक 2/89 खेळाचे मैदान विकसित करणे आणि स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्रमांक सात भोसरी गावठाणातील कबड्डी प्रशिक्षण केंद्र विकसित करणे व अनुषंगिक कामे करण्यात येणार आहे. त्याचे सादरीकरण केले. त्यांचे सादरीकरण समाधानकारक असल्याने छाननी समितीने मान्यता देऊन स्वीकृत केले. या कामांचे पूर्वगणन पत्र तयार करणे व निविदा बनविणे तसेच कामांवर देखरेख करणे ही कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी मे. नियोजन कन्सल्टंट यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.
मोशी येथे अग्निशामक केंद्र बांधणे, पुणे-नाशिक रस्ता ते सर्व्हे क्रमांक 575, 664, 508, 506 पर्यंतचा 30 व 18 मीटर डीपी रस्ता विकसित करणे, च-होली, चोविसावाडी येथे अग्निशमन केंद्र बांधणे, सर्व्हे क्रमांक 110 ते 100 पालिका हद्दीपर्यंतचा 30 मीटर डीपी रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या कामाचे सादरीकरण मे.एन्हायरो सेफ कन्सल्टंट यांनी केले आहे. या कामांचे पूर्वगणनपत्र तयार करणे व निविदा बनविणे तसेच कामांवर देखरेख करण्यासाठी त्यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.
च-होली येथील सर्व्हे क्रमांक 254 ते 228 पर्यंतचा 12 मीटर रस्ता विकसित करणे, चोवीसावाडी येथील सर्व्हे क्रमांक 15 ते च-होली सर्व्हे क्रमांक 940 पर्यंतचा 18 मीटर डीपी रस्ता विकसित करणे, मोशी आळंदी ते डूडूळगाव गावठाणापर्यंतचा 18 मीटर डीपी रस्ता विकसित करणे आणि च-होलीतील सर्व्हे नंबर सात ते महापालिका हद्दीपर्यंतचा विकास आराखाड्यातील 30 मीटर रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या कामांचे पूर्वगणनपत्र तयार करणे व निविदा बनविणे तसेच कामांवर देखरेख करण्यासाठी मे.अँशुअर्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.