पिंपरी-चिंचवड : शहराला पाणीपुरवठा करणार्या पवना धरणातील पाण्याचे जलपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले. मंगळवारी दुपारी हा कार्यक्रम संपन्न झाला. पवना धरण परिसरात जाऊन स्व-हस्ते जलपूजन करणारे ते पिंपरी-चिंचवड शहराचे पहिले महापौर ठरले आहेत. या कार्यक्रमावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, पाणीपुरवठा अधिकारी रामदास तांबे, पवना धरणाचे कार्यकारी अभियंता मनोहर खाडे आदी उपस्थित होते.
98.29 टक्के भरले धरण
यंदा सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पवना धरण सद्यस्थितीत 98.29 टक्के भरले आहे. धरणातील उपयुक्त जलसाठा 8.368 टीएमसी एवढा आहे. पवना धरण परिसरात एक जूनपासून दोन हजार 350 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तुर्तास हायड्रोगेटद्वारे 1 हजार 377.91 क्युसेकने पाणी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. तर सांडव्यावरुन सोडण्यात येणारे पाणी थांबवण्यात आले आहे.