अधिकार्यांची कानउघाडणी; अधिकारीही आले दुचाकीवर
जळगाव :शहरात अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून अनेक ठिकाणी नागरिकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असल्याने महापौर भारती सोनवणे यांनी मनपात आयोजित बैठकीत मनपा प्रशासन, मक्तेदार आणि मजीप्रा अधिकार्यांची चांगलीच कानउघडणी केली. इतकंच नव्हे तर महापौर स्वतः दुचाकीवर अधिकार्यांसह पिंप्राळा परिसरात फिरल्या. महापौर भारती सोनवणे यांनी दिलेल्या सुचनेनंतर लागलीच अमृत योजनेसाठी खोदलेल्या चार्यांच्या डागडुजीचे आणि आवश्यकता असलेल्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे.
मनपात महापौर भारती सोनवणे यांनी अमृतचे मक्तेदार प्रतिनिधी पंकज बर्हाटे, मनपा अधिकारी सुनील भोळे व मजीप्रा अधिकारी ए.जी.पाटील, मनपात बैठक घेतल्यानंतर लागलीच त्या कामाची प्रत्यक्षात पाहणीसाठी पिंप्राळा परिसरात फिरल्या. यावेळी महिला बालकल्याण सभापती शोभा बारी, नगरसेवक कैलास सोनवणे, कुलभूषण पाटील, आबा कापसे, सुरेश सोनवणे, शफी शेख आदी उपस्थित होते.
डागडुजीची कामे मार्गी लावा
महापौर यांनी निसर्ग कॉलनी, गणपती नगर, सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा परिसरात पाहणी केली. गल्लीबोळात फिरून, चिखलातून मार्गक्रमण करीत असताना संबंधित मक्तेदाराला पाईपलाईनसाठी खोदलेल्या चार्या लागलीच बुजवून त्याठिकाणी डांबरीकरण करण्याचे सांगितले तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी अमृत योजनेसाठी खोदलेल्या रस्त्यांची सर्व डागडूजीची कामे मार्गी लावण्याचे आदेश केले.