जळगाव । शहरात सुरु असलेल्या साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापौर ललित कोल्हे यांच्या सूचनेनुसार काल प्रशासनाने 100 कर्मचारी यांचे पथक स्थापन केले. या सर्व कर्मचार्यांना सकाळी सहावाजता शाहु महाराज रुग्णलयात बोलविण्यात आले होते. प्रत्यक्षात 40 कर्मचारीच हजर झाल्याने महापौर कोल्हे संतप्त झाले. जे कर्मचारी येत नसतील अश्या कर्मचार्यांना तात्काळ निलंबित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.
महापालिकेने काल गुरुवारी साथरोग नियंत्रणासाठी 100 कर्मचार्यांचे पथक स्थापन केले. या पथकातील सर्व कर्मचार्यांना सकाळी सहा वाजता शाहु महाराज रुग्णालयात हजेरी देण्यास सांगण्यात आले होते. सकाळी उपायुक्त चंद्रकांत खोसे, सहाय्यक उपायुक्त लक्ष्मीकांत कहार या अधिकार्यांसह महापौर ललित कोल्हे व नगरसेवक अनंत जोशी उपस्थित होते.
महापौरांनी केली कानउघाडणी
सकाळी पथकाची हजेरी घेतली असता, नियुक्त केलेल्या 100 पैकी केवळ 40 कर्मचारीच हजर होते. तब्बल 60 कर्मचारी प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सूचना देवूनही हजर न झाल्याने महापौर कोल्हे संतप्त झाले. त्यांनी उपायुक्तांसह सर्व अधिकार्यांना बोलावून तात्काळ या 60 कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस द्या, उद्या पुन्हा हजर न झाल्यास निलंबित करा अश्या सूचना दिल्यात. यामुळे सतप्त उपायुक्तांनी देखिल अस्थापना अधिक्षक मराठे यांची कानउघाडणी केली. यावेळी शाहु महाराज रुग्णालयातील मलेरीया विभागाची पाहणी केली असता, महापौर कोल्हे व नगरसेवक जोशी यांना त्या ठिकाणी नविन पॅकींगमध्ये असलेले तब्बल 40 फवारणीचे स्प्रे पंप आढळून आले. हे पंप काढून तात्काळ पथकातील कर्मचारी यांना देण्याचे आदेश केले. शहरातील 74 पैकी प्रत्येक वार्डात स्प्रे पंपासाठी 1 कर्मचारी व साठवलेल्या पाण्यात अळीनाशके टाकण्यासाठी 1 कर्मचारी असे दोन कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत.