जळगाव। माझी बदली आरोग्य विभागात का केली अशी विचारणा करीत जितेंद्र यादव या कर्मचार्याने महापौर नितीन लढ्ढा यांना धमकवण्याचा प्रकार शुक्रवार 18 ऑगस्ट रोजी घडला. महापौर लढ्ढा हे आपल्या दालनात पदाधिकार्यांशी बोलत असतांना महापालिकेचे कर्मचारी जितेंद्र यादव हे देखील तेथे बसलेले होते. त्यांनी महापौर लढ्ढा यांना माझी बदली तुमच्या सांगण्यावरून करण्यात आली असल्याचा आरोप केला. यावेळी महापौर लढ्ढा यांनी बदली करण्याचा अधिकार हा प्रशासनाचा असून तात्कलीन आयुक्त जीवन सोनवणे यांनी बदली केली असल्याचे यादव यांना स्पष्ट केले.
असूयेपोटी महापौरांनी बदली केल्याचा आरोप
महापौर समजावणीच्या सूरात बोलत असतांना यादव यांनी आवज वाढवून महापौरांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. मी सिव्हील इंजीनिअर असतांना माझी आरोग्य विभागात बदली का केली अशी वारंवार विचारणा यादव करीत होते. वाद वाढल्याने दालनात उपस्थित असलेले नगरसेवक अनंत जोशी व संदेश भोईटे यांनी यादव यांना महापौरपदाचा आदर करून व्यवस्थित बोलण्यास सांगितले. यादव व उपस्थितांमध्ये शाब्दीक वाद वाढत गेला. यावेळी यादव यांनी महापौरांमुळेच माझी बदली झाली असल्याचा दावा पुन्हा केला. महापौर लढ्ढा यांनी यादव यांना बदली करतांना काही चुक झाली असल्यास अर्ज करून बदली करून घ्यावी असे सांगितले. मात्र, यादव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यादव यांनी महापौर लढ्ढांमुळेच मला त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी केला. महापौरांशी त्यांच्या दालनात जावून गैरवर्तन केल्याने यादव यास तात्काळ निलंबित करण्याचे आदेश लढ्ढा यांनी उपायुक्त चंद्रकांत खोसे यांना दिलेत.