17 जानेवारीला विस्तारित इमारतीत जाणार; जागा वाटपावरून वाद शक्य?
पुणे : महापालिकेच्या विस्तारीत इमारतीत अखेर पदाधिकार्यांच्या प्रवेशाची तारीख निश्चित झाली आहे. पुढील आठवड्यात 17 जानेवारीस महापौरांसह सत्ताधारी भाजपचे सर्व पदाधिकारी नवीन कार्यालय वापरण्यास सुरुवात करणार आहेत. दरम्यान, अद्याप काही राजकीय पक्षांची जागा वाटपावरून नाराजी कायम असल्याने या जागांवरून वाद होण्याचीही शक्यता आहे.
महापालिकेकडून सुमारे 50 कोटी रुपये खर्चून विस्तारीत इमारत बांधण्यात आली. या इमारतीमधील सभागृहाचे उद्घाटन 21 जूनला उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर पुढील महिन्याभरात काम पूर्ण होऊन सर्व पक्षांच्या पदाधिकार्यांची कार्यालये तसेच नगरसचिव विभाग या इमारतीमध्ये स्थलांतरीत होणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर सात महिने झाले तरी केवळ मुख्यसभेचे सभागृहच वापरले जात आहे. या इमारतीत राजकीय पक्षांना द्यायची जागा निश्चित होत नसल्याने कोणतेही कार्यालय अद्यापही स्थलांतरीत करण्यात आले नव्हते. भाजपने आपल्या पक्षाच्या पदाधिकार्यांसह प्रमुख राजकीय पक्षांना कार्यालयांच्या जागा दिल्या आहेत. त्यानंतरही अद्याप काही राजकीय पक्षांमध्ये नाराजी असली तरी, भाजपच्या पदाधिकार्यांनी जुन्या दालनातील साहित्य हलविण्यास सुरुवात केली आहे. जुन्या इमारतीमधील कार्यालयांची जागा स्मार्ट सिटीसाठी देण्याबाबत प्रशासनाकडून विचार सुरू आहे.