महापौर चषक कुस्ती स्पर्धेत 275 हून अधिक कुस्तीगीर

0

नवी मुंबई । महाराष्ट्राच्या मातीची ओळख सांगणार्‍या कुस्ती या क्रीडा प्रकाराबद्दल आधुनिक शहर म्हणून ओळख सांगणा-या नवी मुंबईतही कमालीची आपुलकी आहे. मागील सात वर्षे अतिशय उत्साहात संपन्न होत असलेल्या नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत यावर्षी तब्बल 275 हून अधिक कुस्तीगिरांनी सहभाग घेतला असून त्यात 30 युवतींचाही समावेश आहे हे यावर्षीच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोपरखैरणे सेक्टर 8 येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या मैदानात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा तालिम संघाच्या सहकार्याने 10 व 11 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या दोन दिवसीय महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी सभागृह नेते रवींद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती विशाल डोळस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे व खजिनदार सुरेश पाटील, माजी नगरसेवक कोंडिबा तिकोने, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, नवी मुंबई कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष कर्नल शिरगावकर मान्यवर उपस्थित होते.

4 लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार
ही स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत होत असून, कुस्तीगिरांच्या मागणीनुसार यावर्षी राज्यस्तरीय युवकांचा एक गट वाढवण्यात आला आहे तसेच ’दंगल’ चित्रपटातून प्रेरणा घेऊन महिला कुस्तीगिरांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेऊन महिलांचाही एक राज्यस्तरीय गट वाढवण्यात आला आहे. अशाप्रकारे राज्यस्तरीय तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रस्तरीय अशा एकूण 8 वजनी गटांत ही स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेतील विजेत्या राज्यस्तरीय कुस्तीगिरास 1 लाख रक्कमेचा ’नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय’ किताब मानाच्या गदेसह प्रदान केला जाणार आहे.

55 ते 65 किलो राज्यस्तरीय विशेष वजनी गटातील विजेत्या कुस्तीगिरास 21 हजार रक्कमेचा ’राज्यस्तरीय नवी मुंबई महापौर युवक चषक’ मानाच्या गदेसह दिला जाणार आहे. सर्व वजनी गटातील प्रथम चार क्रमांकांना चषक, प्रशस्तिपत्र आणि एकूण 4 लाखांहून अधिक रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. इतर क्रीडा प्रकारांप्रमाणेच कुस्ती खेळामध्येही नवी मुंबईतील युवक रूची घेताना दिसतात. त्यामुळे या उदयोन्मुख खेळाडूंना आपले कसब दाखवण्याची संधी मिळावी तसेच त्यांच्यासमोर राज्यातील नामांकित पहिलवानांच्या खेळाचे प्रदर्शन होऊन त्यामधून काही शिकता यावे ही भूमिका नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिका प्रतिवर्षी कुस्तीचा हा राज्यस्तरीय फड भरवत असून, या सामन्यांतून नामांकित मल्लांचा चुरशीचा खेळ अनुभवण्यासाठी कुस्ती शौकीनही मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. यावर्षी 275 हून अधिक पुरूष महिला कुस्तीगिरांचा सहभाग असल्याने राष्ट्रीय स्तर गाजवणार्‍या पहिलवानांचा खेळ बघण्यासाठी उद्घाटनापासूनच प्रेक्षक गॅलरी क्रीडा रसिकांनी भरलेली होती.