जळगाव। जळगावचे महापौर नितीन लढ्ढा यांनी आज जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे सायंकाळी 7.40 वाजेदरम्यान रितसर राजीनामा दिला असून त्यांच्याजागी मनसे नेते तथा विद्यमान उपमहापौर ललीत कोल्हे यांची वर्णी लागणार असल्याचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नितीन लढ्ढा यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. खुद्द लढ्ढा यांनी गेल्या काही दिवसांपासून यावर चुप्पी साधली होती. यातच मंगळवारी ललित कोल्हे यांनी मुंबई येथे सुरेशदादा जैन यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात होते.
बहूप्रतिक्षीत राजीनामा सुपूर्द
आज राजीनामाबाबत दिवसभर तर्कवितर्क केले जात होते. सुरेशदादा जैन जळगावी आल्यावरच निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात होते. परंतु सायंकाळी उशिरा महापौर नितीन लढ्ढा यांनी आपला राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर ललीत कोल्हे यांची वर्णी लागणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. तथापि, उपमहापौरपदी कुणाची वर्णी लागणार? याबाबत मात्र उत्सुकता लागली आहे.