महापौर बंगल्यावर महापौरांची शेवटची गुढी

0

मुंबई  – ऐतिहासिक महापौर बंगला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 30 वर्षांच्या लिजवर देण्यात येणार असल्यामुळे या बंगल्यातला महापौरांचा हा शेवटचा गुढी पाडवा ठरतोय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेसाठी स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने या जागेवर शिक्कामोर्तब केले आहे.

या समितीनं मुंबईतल्या अनेक जागांचा अभ्यास केल्यानंतर महापौर बंगल्याची जागा या स्मारकासाठी निश्चित केली आहे. या बंगल्यात स्मारक झाल्यानंतर मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान मुंबईत राणीच्या बागेत हलवण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा महापौर बंगल्यातला महापौरांचा हा शेवटचा गुढीपाडवा असल्याचे मानले जात आहे. मंगळवारी गुढीपाडव्या निमित्त मुंबईचे नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर बंगल्यावर गुढीचे पूजन केले. यावेळी त्यांच्या सौभाग्यवती आणि परिवारातील मंडळी देखील उपस्थित असल्याचे चित्र पहायला मिळाले. येत्या वर्षात या ठिकाणी महापौर बंगल्याला बाळासाहेबांच्या स्मारकाचे स्वरुप प्राप्त होणार असल्यामुळे यंदाची महपौर बंगल्यावरची गुढी ही अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.