महापौर राहुल जाधव अधिकाऱ्यांवर बरसले; स्वच्छतेसाठी दिली एका आठवड्याची डेडलाईन

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. कचरा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृहे साफ केली जात नाहीत. नियमितपणे कचरा उचलला जात नाही. शहरात माणसे राहतात की जनावरे असा संतप्त सवाल महापौर राहुल जाधव यांनी अधिकाऱ्यांना केला. स्वच्छतेसाठी हवी ती मदत करायला तयार आहे परंतु, येत्या गुरुवारपर्यंत शहर चकाचक करण्याची डेडलाईन त्यांनी अधिका-यांना दिली.

महापौरांनीआरोग्य विभाग आणि क्षेत्रीय अधिका-यांना चांगलेच फैलावर घेतले. शहर स्वच्छ ठेवता येत नसेल तर राजीनामे देऊन घरी बसा, असा इशाराही दिला.

महापालिकेतील शहरातील विविध प्रश्नांवर आधारित आढावा बैठक झाली. यावेळी महापौर राहुल जाधव, वाहन कार्यशाळा विभागाचे प्रमुख आणि सह शहरअभियंता प्रवीण तुपे, आरोग्य अधिकारी मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, संदीप खोत, आण्णा बोदडे, विजय खोराटे, स्मिता झगडे, आशा राऊत,आणि अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

कचरा संकलन करणा-या गाड्याची तातडीने दुरुस्ती करावी, सुट्टीच्या दिवशीही कार्यशाळा चालू ठेवावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या. आरोग्य अधिकारी मनोज लोणकर म्हणाले, गाड्यांची कमतरता आहे. कार्यशाळेतून गाड्या लवकर दुरुस्त करुन दिल्या जात नाहीत. शनिवार, रविवार दोन दिवस कार्यशाळा बंद असते. त्यामुळे अडचणी येत आहेत. त्यानंतर महापौरांनी कार्यशाळा विभागाच्या प्रमुखांना बोलावून घेतले. नवीन गाड्यांची खरेदी होईपर्यंत सर्वप्रथम आरोग्य विभागाचीच वाहने दुरूस्त करावीत. तसेच येत्या आठवडा भरानंतर परिस्थितीत सुधारणा केली नाही तर कोणाचीही गय केली जाणार नाही, असे महापौर म्हणाले.