महापौर ललीत कोल्हे समर्थकांसह भाजपमध्ये दाखल

0

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेचे विद्यमान महापौर ललीत कोल्हे यांनी आज आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ललीत कोल्हे यांनी मनसेच्या तिकिटावर गत महापालिका निवडणुकीत तब्बल १२ नगरसेवक निवडून आणले होते. बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांना महापौरपदाचीही संधी मिळाली. दरम्यान, निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी आमदार सुरेशदादा जैन यांच्या सोबत निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. यामुळे जळगावातील मनसेला जबर धक्का बसला होता. यानंतर काही दिवस उलटत नाही तोच आता ललीत कोल्हे आणि त्यांच्या समर्थकांनी आज सायंकाळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी ना. गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूभाई पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हे यांच्या प्रवेशामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता युती होणार की नाही? याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. युती न झाल्यास आ. सुरेशदादा जैन यांचा गट, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढत होण्याचे चिन्ह आहेत.