महापौर वेटलिफ्टिंग चषक स्पर्धेचे उद्घाटन

0

जागतिक पातळीवरील खेळाडू तयार झाले पाहिजे – महापौर काळजे

पिंपरी : जागतिक पातळीवर महापालिका हद्दीतील खेळाडू तयार झाले पाहिजेत. खेळाला, खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी महापौर चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. महानगरपालिका विकासाबरोबरच खेळाला प्राधान्य देत असते, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले. महानगरपालिकेच्या व पुणे जिल्हा वेट लिफ्टिंग असोसिएशनच्यावतीने आयोजित माजी महापौर विलास विठोबा लांडे चषक जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मोरया गोसावी क्रिडा संकुल येथे या स्पर्धा होत आहेत.

यावेळी नगरसेविका अपर्णा डोके, अश्‍विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, नगरसेवक सुरेश भोईर, मोरेश्‍वर शेंडगे, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी राजेश जगताप, क्रिडा पर्यवेक्षक राजू कोतवाल, अशोक पटेकर, जयश्री भोज, अनिता पालवे, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटना सचिव प्रमोद चोळकर, पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव सुधीर माळसकर, वेटलिफ्टिंगचे ज्येष्ठ मार्गदर्शक बिहारीलाल ठुबे, सजना पांडे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर बच्चे, विजय पाटील, अश्‍विनी पाटील, तुकाराम गायकवाड, पाटोळे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी आदी उपस्थित होते.

खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी!
महापौर काळजे पुढे म्हणाले की, खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. यामुळे खेळाडुंनी मोठ्या संख्येेने अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले पाहिजे. यातूनच जागतिक पातळीचे खेळाडू तयार होण्यासाठी महापालिका सातत्याने असे उपक्रम राबवित असते. खेळाडूंनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन महापालिकेचा लौकिक वाढवावा. खेळाडुंनी आपल्या शहराचा नावलौकीक वाढविण्यासाठी जास्त कष्ट घेतले पाहिजेत.

माजी महापौर विलास विठोबा लांडे महापौर चषक जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा (महिला व पुरूष) 2017-18 या स्पर्धेत 170 खेळाडुंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत विजयी होणार्‍या खेळाडुंना रोख बक्षिसे, ट्रॉफी, मेडल्स प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली. यावेळी वेटलिफ्टिंग ज्येष्ठ मार्गदर्शक बिहारीलाल दुबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक क्रिडा पर्यवेक्षक राजू कोतवाल यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक क्रिडा पर्यवेक्षक राजू कोतवाल यांनी केले. सूत्रसंचालन क्रिडा पर्यवेक्षक अशोक पटेकर यांनी केले. तर आभार क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे यांनी मानले.