महापालिका प्रतिनिधी | चिन्मय जगताप | केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे ‘स्वच्छ अमृत महोत्सव 2021 अंतर्गत’ कचरा मुक्त शहरासाठीचा 3 स्टार रेटिंग पुरस्कार जळगाव शहराला देण्यात आला आहे. मात्र, जळगाव शहरात अस्वच्छता असताना जळगाव शहराला हा पुरस्कार मिळाला कसा ? असा प्रश्न आता महापालिका वर्तुळातूनच उपस्थित होऊ लागला आहे.
शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक ‘जनशक्ती’शी बोलताना म्हणाले, की जळगाव शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढीग दिसतात. अशावेळी नक्की हा पुरस्कार मिळाला तरी कसा हा प्रश्न मलाही पडला आहे आणि मी चक्रावून गेलो आहे. माझ्या मते तरी जळगाव महानगरपालिकेतील अधिकार्यांनी नक्कीच काही तरी माहिती पुरवण्यात घोळ केला असून, हा पुरस्कार खोट्या माहितीच्या आधारावर मिळवला आहे, असे नाईक म्हणाले. या पुरस्कारामध्ये कचरा विलगीकरण हा देखील एक महत्वाचा मुद्दा होता मात्र, जळगाव शहरात ही प्रक्रिया होत नाही, असा दावाही नाईक यांनी केला.
पवन पाटील यांना विचारणार जाब
हा पुरस्कार घेताना महापौर जयश्री महाजन यांच्याबरोबर सहायक आयुक्त पवन पाटील हे देखील उपस्थित होते. यामुळे मी येत्या काळात नक्की कोणत्या आधारे जळगाव शहराला हा पुरस्कार मिळाला याचा जाब पवन पाटील यांना महासभेत विचारणार आहे, असे देखील प्रशांत नाईक यांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकारणे हा हास्यास्पद प्रकार
भाजपच्या अभ्यासू नगरसेविका अॅड. शुचिता हाडा म्हणाल्या, की जळगाव शहरात सुरू असलेले घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प अर्धवट आहेत. जळगाव शहराची अस्वच्छतेबाबतची अवस्था सर्वश्रृत आहे. त्यामुळे महापौर जयश्री महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारणे हास्यास्पद आहे. वॉटरग्रेसला यांनी आतापर्यंत लक्ष्य केले. मात्र, आता सर्वकाही सुरळीत सुरू आहे, असे दाखविण्याचा यांचा प्रयत्न आहे. याबाबत महासभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे अॅड. हाडा यांनी सांगितले.