हिवरा आश्रम : विवेकानंद जन्मोत्सवास येणारे भाविक म्हणजे चालते-बोलते देवच आहेत, अशी भावना ठेवून त्यांच्यात ईश्वरत्व पाहणारे निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराज यांनी आपला देह त्यागण्यापूर्वी 2015मध्ये साजरा झालेल्या विवेकानंद जन्मोत्सवात महाप्रसादास आलेल्या भाविकांची चंदन तिलक लावून व धुप ओवाळून पूजा केली होती. एकप्रकारे ती परम्-ईश्वराचीच महापूजा होती. यंदाच्या महाप्रसाद वाटपावेळीही ही महापूजा केली जाणार असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली. ही परंपरा आता खंडित होणार नाही, सर्वाभुती देव या भावनेतून या जनता जर्नाधनाचे पूजन करून त्यांना महाराजश्रींच्या मायेचे महाप्रसादाचे दोन घास खाऊ घातले जातील, असेही गोरे म्हणाले. तीन लाख भाविकांना जन्मोत्सवाच्या शेवटच्या दिवशी 151 क्विंटल पुरी, 100 क्विंटल वागेभाजीचा महाप्रसाद वितरित करण्याची जबाबदारी परिसरातील 300 खेड्यापाड्यांतील चार हजार स्वयंसेवकांनी घेतली आहे, असेही गोरे यांनी सांगितले.
‘तुम्हीच माझे देव, तुमचे पूजन करणार, नैवेद्य दाखविणार’!
6 ते 8 जानेवारीदरम्यान साजरा होणार्या विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता शेवटच्या दिवशी सुमारे तीन लाख भाविकांना महाप्रसाद वितरणाने होणार आहे. या महाप्रसादासाठी 151 क्विंटल पुरी, 96 क्विंटल वांगी लागतात, दोन दिवसाच्या रात्रंदिवस मेहनतीतून हा प्रसाद तयार होत असतो. महाप्रसाद तयार करणे ते वितरित करण्याची जबाबदारी हिवरा आश्रम गावासह परिसरातील 300 गावांतील चार हजार स्वयंसेवकांनी स्वीकारली आहे. महाप्रसाद म्हणजे चालत्या बोलत्या देवाला खाऊ घातलेले मायेचे दोन घास आहेत, त्यातून जाती, धर्म व लिंगभेद विसरून सर्व जीव एकत्र येतात आणि सामाजिक एकोपा वाढीस लागतो, अशी पूज्यनीय शुकदास महाराजश्रींची भावना होती. 2015च्या जन्मोत्सवात ‘तुम्हीच माझे देव आहात, आज तुमची पूजा करणार आहे, तुम्हाला नैवेद्य दाखविणार आहे, कारण मी तुमचा भक्त आहे’, असे म्हणून त्यांनी सर्व भाविकांना चंदन तिलक लावून व धुपारतीने ओवाळून त्यांचे पूजन केले होते. महाराजश्री समाधीस्थ होऊन चैतन्यस्वरुप झाले असले तरी, त्यांनी तेव्हा केलेल्या महापूजनाची परंपरा यंदापासून कायम राहणार असल्याचेही संतोष गोरे यांनी सांगितले.
आर. बी. मालपाणी संमेलनाध्यक्ष, अशोक थोरहाते स्वागताध्यक्ष
बहुचर्चित विवेकानंद विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भगवतगीतेचे चिंतनकार तथा विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष तपोमूर्ती आर. बी. मालपाणी हे भूषविणार आहेत. तर उपाध्यक्ष अशोक थोरहाते हे स्वागताध्यक्ष आहेत. रामकृष्ण मठ, पुणेचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंदजी हे संमेलनाचे उद्घाटक असून, 6 जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. तीन दिवस चालणार्या या विचारमंथनात स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा जागर होणार असून, त्यासाठी देशभरातील विवेकानंदांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या मान्यवरांसह भाविक-भक्तदेखील हिवरा आश्रम येथे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.