पुणे : उत्तर भारतातील थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने अतिथंड वारे वाहत येत असल्याने राज्यात बहुतांश भागात थंडीचा कडाका वाढणार आहे. यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि मध्यम महाराष्ट्रात थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुण्यात पुन्हा थंडी वाढू लागली
पुणे शहर आणि उपनगरात मागील दोन दिवसांपासून किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे थंडी कमी होतेय असे वाटत असतानाच शनिवारी रात्री पुन्हा थंडी वाढली. रविवारी सकाळी 10.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. मागील पंधरा दिवसांपासून शहरातील किमान तापमान 9 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविले जात आहे. पुढील तीन ते चार दिवस शहर व परिसरातील किमान तापमानाचा पारा 12 अंशांच्या जवळपास राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविलेला असतानाच रविवारी पहाटे किमान तापमानाचा पारा 10.9 अं. से.वर आला होता.
नाशिक, जळगाव गारठले
रविवारी नाशिकमध्ये राज्यातील नीचांकी 8.0 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत महाराष्ट्र आणि उत्तर भारतावर 1012 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार आहे. दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीवर 1010 हेप्टापास्कल इतका राहणार असल्यामुळे उत्तरेकडील थंड वारे दक्षिणेकडे वाहणार आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश भागात थंडीचे प्रमाण सारखेच राहील.
11 जानेवारीपर्यंत राज्यात हवामान कोरडे
रविवारी कोकण-गोवा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. 11 जानेवारीपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मागील 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदविण्यात आलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुढीलप्रमाणे :
मुंबई (कुलाबा) 17.5, सांताक्रूझ 13.8, अलिबाग 16.1, रत्नागिरी 15.8, भिरा 13.5, पुणे 10.9, अहमदनगर 11.2, जळगाव 8.2, कोल्हापूर 16.3, महाबळेश्वर 11.5, मालेगाव 11.6, नाशिक 8.0, सांगली 14.6, सातारा 12.2, सोलापूर 13.9, औरंगाबाद 11.6, परभणी 12.2, अकोला 12.6, अमरावती 14.0, बुलडाणा 13.6, ब्रह्मपुरी 10.8, चंद्रपूर 10.6, नागपूर 11.0, यवतमाळ 12.4.