महाभारतातले रामायण

0

उत्तर प्रदेश विधानसभेत उडालेला धुव्वा सहन केल्यावर आता हळूहळू दुखणी चव्हाट्यावर येऊ लागली आहेत. मायावतींनी तत्काळ मतदान यंत्रावर शंका घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. पण तुलनेने मुलायमसिंग गप्प होते. खरेतर त्यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला येऊ घातलेला पराभव दिसत होता अन्यथा त्यांनी आपल्या लाडक्या पुत्राला पक्षाचा असा धुव्वा उडवू दिला नसता. पक्षात मुलायम यांचा दबदबा नसेल असे कोणी मानू शकत नाही. पण शिवपाल यादव हा धाकटा भाऊ आणि अखिलेश हा लाडका पुत्र, यापैकी निवड करताना आपण पक्षपात केलेला नाही, असे दाखवण्यासाठी या यादवकुलीन राजकारण्याने श्रीकृष्णालाही मागे टाकले. तेव्हा कौरव-पांडव श्रीकृष्णांची मदत मागायला पोहोचले असताना, त्याने दोघांसमोर पर्याय ठेवले होते. त्यात एकाला सैन्य मिळेल आणि दुसर्‍याला फक्त शस्त्र न उचलणारा साक्षात श्रीकृष्ण मिळेल, असा पर्याय होता. त्यात दुर्योधनाने सैन्याची निवड केली, तर अर्जुनाने श्रीकृष्णाला पत्करले होते. कारण सैन्यापेक्षाही साक्षात विष्णूचा अवतार असलेला श्रीकृष्ण अधिक प्रभावी असतो, हे अर्जुनाला ठाऊक होते, तसे झालेली. पण ते कलियूग नव्हते की मुलायम हा महाभारत काळातला श्रीकृष्णही नाही. बिचार्‍या शिवपाल यादव यांना हेच लक्षात आले नाही. त्यांनी दुर्योधनाची चूक सुधारण्यासाठी सैन्य नाकारून आधुनिक श्रीकृष्ण मुलायमची निवड केली आणि अखिलेशला समाजवादी पक्षाची सेना घेऊ दिली. साहजिकच कलियुगात सेना जिंकते आणि परमेश्‍वर पराभूत होतो, हे आता शिवपालच्या लक्षात येते आहे. कारण निवडणुका संपुन निकाल लागल्यावरही अखिलेशने चुलत्याला माफ केलेले नाही. विधानसभेतले विरोधी नेतेपद मिळावे इतकीही चुलत्याची अपेक्षा पुतण्याने पार धुडकावून लावली आहे, तर कलियुगातला श्रीकृष्ण शिवपालची समजूत घालतो आहे.

मतमोजणी संपून उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचा धुव्वा उडाला आहे. पण त्याचवेळी समाजवादी पक्षातील मुलायमचे समकालीन सर्व नेते सहकार्‍यांचा पक्षातही धुव्वा उडाला आहे. कारण पक्षांतर्गत संघर्षात सर्व सूत्रे हाती आल्यावर मुलायमना त्यात निर्णय घेण्याचे अधिकार उरलेले नाहीत आणि अखिलेशने नव्या व्यवस्थेत विधीमंडळ पक्षाचे नेतृत्व आपल्या हाती राखताना, चुलत्याला विधानसभेतही नेतेपद मिळू दिलेले नाही. साहजिकच शिवपाल यादव नाराज आहेत. अशावेळी त्याला शांत करण्याची जबाबदारी थोरला भाऊ मुलायमची असल्याने, त्यांनी पुन्हा एकदा धाकट्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. याक्षणी पक्षात बंड पुकारून नव्या पक्षाची स्थापना करणेही शिवपालना शक्य नाही. कारण आता त्यांच्या पाठीशी दोनचार कार्यकर्तेही उरलेले नाहीत आणि मुलायमच्या जुन्या सहकार्‍यांना घेऊनही शिवपाल नवे काही उभारण्याच्या स्थितीत नाहीत. साहजिकच हा नेता आपल्या झालेल्या जखमा चाटत बसला आहे आणि मुलायम त्याची समजूत घालण्यासाठी पुत्राला शिव्याशाप दिल्याचे झकास नाटक रंगवत आहेत. ज्या मुलाने पित्यालाच जुमानले नाही व टांग मारली, तो दुसर्‍या कुणालाही फसवू शकतो असे, मुलायमनी एका भाषणात म्हटले आहे. अखिलेशने आपल्याला फसवले असे मुलायमना म्हणायचे आहे, असाच त्याचा अर्थ काढला जाणार. किंबहुना तसाच अर्थ काढावा, अशी मुलायमची अपेक्षाही आहे. पण मुलाने इतके फ़सवले अशीच पित्याची धारणा असती, तर ती व्यक्त व्हायला इतका विलंब लागण्याचे काहीही कारण नव्हते. उत्तर प्रदेश विधानसभेचे निकाल लागून तीन आठवडे पूर्ण होत आले आहेत आणि नवे सरकारही सत्तारूढ झालेले आहे. त्या सरकारच्या शपथविधीला मुलायम त्याच दगाबाज पुत्रासह कशाला हजर होते? त्यांनी अखिलेशला सोबत घेऊन पंतप्रधानांची लोकांसमक्ष कशाला भेट घेतली होती?

नवे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांच्या सत्तारोहणाचा कार्यक्रम पार पडला, त्याला पंतप्रधान मोदी हजर होते. तो उरकल्यानंतर व्यासपीठावर अनेकजण जाऊन पोहोचले. त्यात मुलायम होते आणि त्यांच्यासोबत मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादवही होते. आपल्या पुत्राची पंतप्रधानाची ओळख करून दिल्यासारखा तो प्रसंग होता. खरेच पुत्राने दगाबाजी केली असे मुलामयना वाटले असते, तर त्यांनी तिथे पुत्रासोबत मोदींची भेट घेतली नसती. जगाला आपले पुत्रप्रेम अशा प्रसंगातून दाखवले नसते. कारण तो प्रसंग राजकीय होता आणि समाजवादी पक्षासाठी सत्ता गमावल्याने यातनामय असाच होता. औपचारिकता कोणी नाकारत नाही. पण पक्षाचा दारुण पराभव घडवून आणणार्‍या पुत्राविषयीची मुलायमची आस्था त्यातून अधिक स्पष्ट झाली. साहजिकच आता शिवपाल यादव यांना झिडकारले गेल्यावर आलेली मुलायमची प्रतिक्रिया कितपत खरी मानावी असा प्रश्‍न आहे. अर्थात यातले नाटक नवे नाही. पक्षात माजलेली दुफळी व पितापुत्र यांच्यातला संघर्षच मुळात अप्रतिम नाटक होते. एकाने मारल्यासारखे करावे आणि दुसर्‍याने लागल्यासारखे करावे, असाच प्रयोग रंगला होता. त्यात आपला वारसा पुत्राकडे सोपवताना कुटुंबातील इतरांचे अधिकार नाकारण्यासाठी मुलायमनी रंगवलेले ते नाटक होते. आपला धाकटा भाऊ आणि कुटुंबातील अन्य वाटेकरी परस्पर निकालात काढण्याचे ते रामायण होते आणि त्यासाठी महाभारताची कथा वापरलेली होती. कैकयीला परस्पर शह देण्यात आला होता. मात्र, त्यात शिवपालचा हकनाक बळी गेला. एकटा शिवपालच नव्हेतर मुलायमचे जुने सहकारी ज्येष्ठ नेतेही पक्षाच्या नेतृत्व स्पर्धेतून याच एका खेळीत बाहेर ़फेकले गेले. आताही पक्षाची सूत्रे मुलाकडे सुखरूप स्थापित व्हावीत, म्हणून त्याच्यावर दगाबाजीचा आरोप करून हा पिता धाकट्या भावाला हुलकावणी देतो आहे.

खरेच मुलायमना पुत्राच्या कर्तृत्वावर विश्‍वास नसता आणि त्याच्याकडेच वारसा सोपवायचा नसता, तर लोकसभा निकालानंतरच अखिलेशची मुख्यमंत्रीपदावरून गठडी वळली गेली असती. समाजवादी पक्षाच्या कुटुंबातील पाच जणांनाच लोकसभेत अन्य कोणाला निवडून आणता आले आणि त्याला सर्वस्वी मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या पुत्रच जबाबदार होता. अशावेळी सत्ता व पक्षाचा प्रभाव टिकवायचा असता, तर मुलायमनी अखिलेशला बाजूला करून राज्यसरकारची सत्ता हाती घेतली असती आणि लोकमत पक्षाविरोधात जाण्याला लगाम लावला असता. तसे काही झाले नाही. मुलायमनी आत्मचिंतन वा आढावा घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आणि विधानसभेच्या कामाला लागण्याचा आदेश देऊन संपवली. इतक्या मोठ्या पराभवासाठी कोणाला जबाबदार ठरवले गेले नाही किंवा कुणाला शिक्षा झाली नाही. त्याचा अर्थच असा होता, की मुलायमनी राजकारणातून निवृत्त होण्याचा व पुत्राकडे राजकीय वारसा सोपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यात कोणी अडथळे आणू नयेत, म्हणून गटबाजीला प्रोत्साहन दिले. आपल्याच निष्ठावान सहकार्‍यांना शह देण्यासाठी वेणीप्रसाद वर्मा किंवा अमरसिंग यांच्यासारखे परागंदा नेते समाजवादी पक्षात पुन्हा आणले. त्यांच्याशी शिवपालला कारस्थाने करण्यास मोकळीक दिली आणि कसोटीची वेळ आल्यावर त्या सर्वांना वार्‍यावर सोडून दिले. दरम्यान पक्षातल्या आमदार व पुढल्या पिढीच्या नेत्यांना अखिलेशची निष्ठावान राहण्यात भविष्य असल्याचेही संकेत देण्यात आलेले होते. सर्वकाही ठरल्याप्रमाणे झालेले असून, यापुढे शिवपाल वा तत्सम मुलायमच्य समकालीन नेत्यांनी गाशा गुंडाळणे, इतकेच त्यांना पक्षातले भवितव्य आहे. म्हणून तर मुलायम पुत्रावर दगाबाजीचा आरोप करतात. पण त्याच्या कब्जातील पक्षाने आपला फोटो व नाव वापरू नये, असे बंधन घालत नाहीत.