महाभारतातील रथाचे अवशेष सापडले

0

लखनो-भारतीय संस्कृती प्राचीन काळी किती पुढारलेली होती, नागरीकरण कसे होते याबाबत अनेक मते व्यक्त होत असतात. परंतु आता पुरातत्व खात्याच्या हाती लागलेल्या पुराव्यावरून एक गोष्ट निश्चित स्पष्ट होत आहे ते म्हणजे चार हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये रथ होते. युद्धामध्ये लागणारी शस्रसंपदा तांबे व कास्य धातूंपासून बनवण्याची कला तत्कालिन भारतीयांनी साधली होती.

शव पुरण्याच्या जागा आढळल्या

उत्तर प्रदेशातील बाघपतमधल्या सिनौली येथे पुरातत्व खात्याला कास्ययुगातील म्हणजे तब्बल ४ हजार वर्षांपूर्वीच्या या वस्तू सापडल्या आहेत. गेले तीन महिने या जागी उत्खनन सुरू असून नुकतीच याबद्दलची माहिती पुरातत्व खात्याने दिली आहे. तलवारी व खंजीरांसारख्या गोष्टींवरून त्या काळात या भागातील समाज योद्धा होते हे स्पष्ट होते. या उत्खननामध्ये एकूण आठ शव पुरण्याच्या जागा आढळल्या आहेत.

कलेचे साहित्य आढळले

कला कुसर केलेल्या अनेक वस्तू, तीन शवपेटिका, मोठ्या तलवारी, खंजीर, कंगवे आदी गोष्टी उत्खननात आढळल्या आहेत. शव पुरलेल्या जागी तीन रथ आढळले असून राजघराण्यातील व्यक्तिंच्या दफनाची शक्यता सूचित होत आहे. या ठिकाणी आढळलेल्या सगळ्या गोष्टी तत्कालिन समाज योद्धा होता असे दर्शवतात असे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

विशेषत: रथाच्या सापडण्यामुळे प्राचीन अशा अन्य संस्कृतींशी, नागरीकरणाशी नाळ जोडली जाते. मेसापोटेमिया, ग्रीस आदी देशांमध्येही रथांचा वापर याच सुमारास मोठ्या प्रमाणावर होत होता. या प्रदेशांमध्ये योद्धा समाज मोठ्या प्रमाणावर राहत होता असे मानण्यास जागा आहे,” पुरातत्व खात्याच्या उत्खनन विभागाचे सहसंचालक एस चे मंजूल यांनी सांगितले.

सदर उत्खनन हे अत्यंत उत्साहवर्धक असून शवपेटिंकावर तांब्याची पिंपळाचं पान असलेली कलाकुसर आहे, जे राजघराण्यातील दफन दर्शवतं असं मंजूल म्हणाले. पानाफुलांची नक्षी असलेली या प्रकारची शवपेटिका भारतीय उपखंडात प्रथमच मिळाली आहे. हडप्पा, मोहेंजोदरो, ढोलाविरा इथेही शवपेटिका आढळल्या होत्या, परंतु त्यांच्यावर कलाकुसर नव्हती, असे निरीक्षण मंजूल सांगतात.