राज्यात सध्या मिनी विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम चालू आहे. राजकीय नेते एकमेकांचा उद्धार करत आपणच कसे चांगले ते सांगत दुसर्यांची असली-नसली अब्रू माध्यमांच्या वेशीवर हजारोंच्या साक्षीने टांगत आहेत. त्यातच मग गुन्हेगारी, भ्रष्टाचार यावरही तावातावाने बोलणे आलेच. ते बोललेही जातेच आहे. पण ते बोलत असतानाच त्याच व्यासपीठावर काहीवेळा गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले महान असे स्थानिक नेतेही मिरवत असतात. स्टार प्रचारक असणारे नेतेही जणू वॉशिंग पावडरमधील गृहिणीच्या थाटात सांगत असतात, दाग अच्छे होते हैं!
आपले राजकीय नेते इतर वेळी कोणतीही भूमिका घेऊ द्या. बोलताना त्यांना एकमेकांवर अगदी भारत-पाकिस्तान संघर्षापेक्षाही जास्त आगपाखड करू द्या. मात्र, काही बाबतीत त्यांचे धोरण हे अगदी एकसमान असते. जणू किमान समान कार्यक्रमच. गुन्हेगारी, भ्रष्टाचार याविरोधात बोलायचेच. अगदी उच्च रवाने. दुसर्यांना त्यासाठी दोषी ठरवून, अगदी टोकाचे आरोपही करायचे. मात्र, ते बोलण्यापुरते. वागताना मात्र आपला तो साव आणि दुसर्याचा तो गुंड. मग अगदी समोरच्या पक्षात असताना ज्याच्यावर वाट्टेल ते आरोप केले. ज्यांच्या गुंडगिरीमुळे महाराष्ट्र हे गुंडराष्ट्र होत असल्याची टीकाही केली असेल त्यांनाच कवटाळून पावन करून घेतले जाते.
राजकारण्यांची ही कला पाच रुपड्यांच्या पेनाचे जग बुडवण्यासाठी वाचण्याचे रक्षा कवच म्हणून पन्नास रुपये घेणार्या भोंदूंनाही लाजवणारी! भोंदू बाबा म्हटले म्हणून कोणाला वाईटही वाटायला नको. कारण या बाबांकडेही जाऊन या नेत्यांनी हवेतून काढलेली माळ, अंगठी, वगैरे, वगैरे घेतलेली असते. हवेतून सारे काढलेले श्रद्धेने आपले मानून घेणारे हे नेते मग आश्वासनेही देतात ती हवेतीलच! आणि एकदा मतदान झाले की मग अनेकदा हवेतील आश्वासने हवेतच विरतात!
अर्थात आजचा विषय आश्वासनांचा नाहीच. राजकीय पक्षांच्या धुलाई आणि चारित्र्य प्रमाणपत्र वितरण यंत्रणेचा आहे. आश्वासनांमध्ये भयमुक्त समाजनिर्मितीचे आश्वासनही दिले जाते. बहुधा त्यासाठीच दुसर्या पक्षांमधील गुंडांना स्वत:च्या पक्षात आणून भयमुक्ततेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले जाते. अर्थात हे पहिले पाऊल स्वत:च्या पक्षाला पराभवाच्या भयापासून, त्याच गुंडांच्या दहशतीपासून मुक्त करण्यासाठीचे असते. समाजाचे भय कमी करण्याचा हेतू चुकूनही नसतो.
त्यामुळेच मग शिवसेना भाजपवर गुंडांना उमेदवारी देत पावन करून घेतल्याचा आरोप करत असतानाच शिवसेनेच्या साठ-सत्तर उमेदवारांवरील गुन्ह्यांची यादी झळकवत मुख्यमंत्री प्रत्यारोप करतात. सर्वात गंमत तर अजितदादांची वाटते. नावाप्रमाणेच दादांचा पक्ष हा काँग्रेसपेक्षाही जास्त सर्वसमावेशक. कुणीही येवो नाही म्हणायचे नाही. परंपरा तशी जुनी. साहेबांपासूनचीच. तेव्हा ठाकूर-कलानी असायचे आता दुसरे असतात, एवढाच फरक. पिंपरी-चिंचवडमध्येतर तसेच चित्र असायचे. मात्र, या वेळी अनेक वादग्रस्तांनी राष्ट्रवादी सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. चिखलात उगवणारे कमळ कसे स्वच्छ असते. तसेच आपण कमळाच्या संगतीने होऊ अशी त्यांची अपेक्षा असणार. त्यावर दादांची प्रतिक्रिया जबरदस्तच! आपली खास माणसे घड्याळ सोडून कमळ धरताना पाहून त्यांना काही राहवले नाही. सोबतच्यांची चांगलीच माहिती असल्याने त्यांनी ओळखले की आपण लोकांना सावध केले पाहिजे. त्यामुळेच त्यांनी आवाहन केले, भाजपच्या हाती सत्ता सोपवली, तर गुंडांच्या हाती मनपा जाईल!
शिवसेनेला तर गुंडगिरी वगैरे खूप छोटे विषय वाटत असावेत. शिवसेना स्टाइल म्हणजे आणखी काय असते भाऊ! तसे या वेळी त्यांच्याकडे गुंड-पुंड कमी जाताना दिसले. त्याचे एक कारण गुंडांचा ओढा हा गृहखाते असलेल्या पक्षाकडेच असतो. आधी राष्ट्रवादी आता भाजप किंवा आधीच एवढे भाऊबंद जेथे आहेत तेथे आपण जाऊन आणखी गर्दी का करायची, असाही व्यावहारिक विचार गुंडांनी केला असावा. अर्थात शिवसेनेचेही म्हणणे तेच असते जे इतरांचे. केस कसल्या आहेत त्यातरी पाहा!
भाजपसाठी हे सारेच नवीन. त्यामुळेच मग एकीकडे दादांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारीख आणि इतर मुद्द्यांवर टीका करताच पेटून उठणारे भाजप नेते, मुंडेंनी ज्यांच्याविरोधात संघर्ष केला त्या पप्पू कलानींच्या मुलाला मांडीवर घेऊन, मोदी, शहांचे फोटो त्याच्यासोबत पप्पू कलानीलाही फलकांवर झळकावले. हा तर भाजपने केलेला गोपीनाथ मुंडेंचा मरणोपरांत अपमानच! पण चालायचेच. जमाना बदल गया है. अब तो दाग अच्छे होते है! सर्वात कहर केला तो आधी सहकार मंत्री विजय देशमुख आणि त्यानंतर सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांनी. वादग्रस्त आणि गुंड प्रवृत्तीचे लोक भाजपमध्ये येत असतील तर त्यांच्यासाठी ही सुधारण्याची संधी आहे. अगोदर त्यांना पक्षात घेऊन निवडून आणू आणि नंतर त्यांना सुधारण्याचं काम करू, असं राज्याचे सहकार राज्यमंत्री सुभाष देशमुख म्हणाले होते तेच खरे!
आपल्याला हेच पवित्र हेतू कळत नाही. निवडणुका जिंकण्यासाठी गुंडांना सोबत घेतले असेल, तर त्यात गैर काय? असा सडेतोड सवाल खासदार शरद बनसोडे यांनी केला.निवडणुकांच्या महाभारतात एक वेगळे रामायणही असते. वाल्यांना वाल्मीकी बनवायचा पवित्र उद्देश असतो. पण आपण उगाच टीका करतो. खरे गुन्हेगार आपणच!