वॉशिंग्टन: अधिकारांचा गैरवापर व संसदेच्या कामात अडथळे आणल्याच्या आरोपांवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची कारवाई 21 जानेवारीपासून सिनेटमध्ये सुरू झाली. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमध्ये बहुमत असल्याने महाभियोगात ते निर्दोष ठरले. त्यामुळे त्यांची महाभियोग खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. महाभियोगास सामोरे जावे लागणारे ट्रम्प हे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते.
सिनेटने डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील आरोप फेटाळून लावत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. रिपब्लिकन पक्षाने 52-48 च्या अंतराने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. काँग्रेसच्या कामात अडथळे आणण्याच्या आरोपातून 53-47 मतांनी ट्रम्प यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. राष्ट्राध्यक्षांवर महाभियोगाची कारवाई होण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी एंड्रयू जॉनसन आणि बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात आली होती. ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव ‘हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज’कडून आला होता. त्या सभागृहात विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे. त्या सभागृहाने ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाचे दोन आरोप निश्चित केले होते.