उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी प्रस्ताव फेटाळला
नवी दिल्ली : भारताच्या सरन्यायाधीशांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळल्याच्या उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या निर्णयावर काँग्रेस पक्षाने टीका केली आहे. उपराष्ट्रपतींनी अत्यंत घाईने हा प्रस्ताव फेटाळला आहे. असे करण्यापूर्वी त्यांनी एखाद्या विशेषज्ञाचा सल्ला घ्यायला हवा होता, अशा शब्दात काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयावर आक्षेप नोंदवला. उपराष्ट्रपतींच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस कोर्टात जाणार असल्याचेही काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी जाहीर केले.
नायडू यांनी सल्ला घ्यायला हवा होता
सिब्बल म्हणाले, सरन्यायाधीशांच्या विरोधातील प्रस्ताव फेटाळण्याचा उपराष्ट्रपतींचा निर्णय तर्कसंगत वाटत नाही. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. घटनात्मक नियमांनुसार केवळ आवश्यक ती संसद सदस्यांची संख्या पाहणे हे राज्यसभेच्या अध्यक्षांचे काम असते. या सदस्यांच्या सह्यांची पडताळणीही करावी लागते. परंतु, हा प्रस्ताव फेटाळण्यापूर्वी कमीतकमी नायडू यांनी सल्ला तर घ्यायलाच हवा होता. मात्र असे न करता त्यांनी अत्यंत घाईत हा निर्णय घेतला, असे मत सिब्बल यांनी व्यक्त केले.
चौकशी समितीलाच अधिकार
राज्यसभेच्या अध्यक्षांना भारताच्या सरन्यायाधीशांवर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार नसतो. सरन्यायाधीशांवर करण्यात आलेले आरोप बरोबर आहेत की चुकीचे आहेत, याबाबत फक्त पूर्णवेळ चौकशी समितीच चौकशी करू शकते. मात्र राज्यसभेच्या अध्यक्षांनी गोंधळाचे वातावरण असताना महाभियोगाबाबतचा प्रस्ताव फेटाळून लावला. आता आम्ही या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावणार आहोत अशी भूमिका सिब्बल यांनी स्पष्ट केली.