शिंदखेडा। ग्रामीण भागातील विद्यार्थींनींना तालूक्याचा ठिकाणी असलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने मानव विकास योजने अंर्तगत मोफत एस.टी.पास सेवा सुरू केली आहे. गेल्या वर्षापर्यंत कोणतीही अट नसल्याने विद्यार्थीनींना सहजपणे या योजनेचा लाभ घेता येत होता. यासाठी शासनाकडून निळ्या रंगाच्या बसेस देण्यात आल्या आहेत. परंतू चालू शैक्षणिक वर्षात या योजनेत अनेक अटी टाकल्यामूळे अनेक विद्यार्थीनी या योजनेपासून वंचित राहणार अशी स्थिती आहे. ही योजना पूर्वीप्रमाणेच राबविण्यात यावी अथवा यासाठी राज्यातील प्रत्येक आगारात बसेसची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी पालक,विद्यार्थीनी व शिक्षकांनी केली आहे. या योजनेत टाकलेल्या अटींचा फटका राज्यातील ग्रामीण भागात शिक्षण घेणार्या सर्वच विद्यार्थीनींना बसणार आहे.काहि विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित राहतील की काय अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.
बैठकीत व्यक्त केली चिंता
यासंदर्भांत किसान हायस्कूलमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालूक्यात शिंदखेडा व दोंडाईचा असे दोन आगार आहेत. या योजनेअंर्तगत शिंदखेडा आगारात चार तर दोंडाईचा आगारात तीन बसेस आहेत. नविन निकषानुसार तालूक्यातून शिंदखेडा आगारातील उपलब्ध बसेसव्दारे प्रति बस120 विद्यार्थीनीं म्हणजे एकूण 480विद्यार्थीनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शहरात पाच कनिष्ठ महाविद्यालय आहेत.यामध्ये ग्रामीण भागातून शिक्षण घेणार्या विद्यार्थीनींची संख्या 700च्या घरात आहे.त्यामुळे 220 पेक्षा अधिक विद्यार्थीनी या योजनेपासून वंचित राहतील अशी भिती आहे. या बैठकिस पी.के.पारधी,एस.एस.सिरसाठ, के.आर.मगरे,दोंडाईचा स्थानक प्रमुख पी.जी.पाटिल, बी.जी.सोनवणे, मुख्याध्यापक पवार, विवीध शाळांचे मुख्याध्यापक व प्रतिनिधी उपस्थित होते.