महामानवाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सजले शहर

0

भुसावळ। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती साजरी करण्यासाठी भुसावळकर सज्ज झाले आहेत. शहरात अपूर्व उत्साह दिसून येत असून, शुक्रवार 14 एप्रिल रोजी अभिवादन, वाहन रॅली, मुख्य मिरवणुकीसह विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पताका, होर्डिंग्ज, बॅनर आदीने शहरासह ग्रामीण भागात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठिकठिकाणी करण्यात आली सजावट
भुसावळ तालुका हा सामाजिक सलोखा जपणारा तालुका म्हणून ओळख आहे. या तालुक्यात विचारांची चांगली देवाणघेवाण होत असल्याने एकमेकांच्या भावनेचा आदर प्रत्येकजण करताना दिसून येते. सध्या शहरात व ग्रामीण भागात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सजावट करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती व इतर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.

सामाजिक उपक्रमांचे आयोजन
विविध ठिकाणी ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे तर अनेक ठिकाणी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाची मेजवानी शहरासह ग्रामीण भागाला मिळणार आहे. रक्तदान शिबीर, सरबत वितरण, अन्नदान आदी महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे मोठ्या धूमधडाक्यात आयोजन करण्यात आले आहे.

विद्युत रोषणाईचा झगमगाट
गेल्या तीन दिवसापासून जयंतीच्या निमित्ताने यशोधरा नगरात प्रबोधनात्मक तथा संगीतमय भीम महोत्सव कार्यक्रम सुरू आहे. एकूणच बाबासाहेबांची जयंती उत्सवात पार पाडण्यासाठी शहरासह ग्रामीण भाग सजलेले दिसून येत आहे. पालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांजवळ आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. घराघरांवर निळे ध्वज उभारण्यात आले आहेत. यंदा प्रथमच निळ्या रंगाचे आकाशकंदिल लावण्यात आले आहेत. जयंतीच्या रेल्वे उत्तर वार्ड परिसर, रेल्वे स्थानक यासह विविध ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळेे शहर उजाळून निघाले आहेे. बाजारपेठेतही सजावटीचे विविध साहित्य खरेदीसाठी आज शहरवासीयांची झुंबड उडाली होती. कापड बाजारात नवीन कपडे खरेदीसाठीही गर्दी होती. सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.