महामार्गाच्या चौपदरीकरणासह डागडुजीला सुरूवात

0

नवी मुंबई । मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासह समांतर पद्धतीने डागडुजी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. पनवेल संघर्ष समितीने जिल्हाधिकार्‍यांकडे गेल्या पंधरा दिवसांपासून पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतल्यानंतर ही माहिती संघर्ष समितीला दिली. तसेच झालेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी पुढील सोमवारी संघर्षच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकार्‍यानी बैठक बोलाविली आहे. सात वर्षापासून महामार्गाच्या कामाबाबत अक्षम्य दिरंगाई सुरू असतांनाच त्याच काळात सात जिल्हाधिकारी आणि भू-संपादन अधिकारीही बदलले गेले.

पनवेल संघर्ष समितीने जिल्हाधिकार्‍यांना साकडे घालून महामार्गाच्या कामाबाबत त्यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी फेंगडे, भूसंपादन अधिकारी श्रीधर बोधे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांची बैठक बोलाविली होती. महामार्गाच्या कामाबाबत दिरंगाई झाल्याने जिल्हाधिकार्‍यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना चांगलेच खडसावल्यानंतर, त्यांनी येत्या दहा दिवसांत ठेकेदार सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीवर ठपका ठेवला. त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटहस बजावण्यात येईल असे सांगून त्यांच्याकडील ठेका काढून घेण्यात येते का? याबाबत कायदेशिर मार्ग काढण्याचे आश्‍वासन फेंगडे यांनी जिल्हाधिकार्‍यांनी दिले असल्याची माहिती संघर्ष समितीला लेखी दिली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पळस्पे ते वडखळपर्यंत गेल्या जानेवारीपासून जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दिले आहे. तसेच वडखळ ते इंदापूरपर्यतच्या कामाची जबाबदारी सुप्रहमवर आहे. पूर्वी पूर्ण महामार्गाचे काम सुप्रहमकडे होते. त्यात दिरंगाई झाल्याने प्रवाशांचा हकनाक बळी जात आहे, इतकी भयावह स्थिती महामार्गाची झाली आहे. ही गांभीर्यपूर्ण परिस्थिती लक्षात घेवून संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मध्यस्ती करण्याची विनंती केली होती. ती मान्य करत महामार्गाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यात आली आहे. संघर्षने चौपदरीकरणासह जुन्या मार्गाची डागडुजी प्राधान्याने करावी, ही मागणी जोर लावून धरल्याने सूर्यवंशी यांनी ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला तशा लेखी सूचना दिल्या आहेत. यासंबंधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने गेल्या दहा दिवसात कोणते निर्णय घेतले आणि पुढील काळात महामार्गाच्या कामाचे कसे नियोजन राहिल, यासंबंधी आढावा घेण्यासाठी संघर्षच्या मागणीनुसार जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या दालनात संयुक्तिक बैठक बोलाविली आहे.

डागडुजीचे आश्‍वासन
आपण गेल्या महिन्याभरात आतापर्यंत सात वेळा आढावा आणि बैठका घेतल्या. आज, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांना लेखी सुचना दिलेल्या आहेत. संघर्षने केलेल्या मागण्यांनुसार ठेकेदारांकडून डागडुजी आणि कामाला गती देण्याचे लेखी आश्‍वासन मागितले आहे.
तसेच कामाला प्रारंभही केला आहे. याबाबत लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ठोस निर्णय घेईल, असे त्यांनी कळविले आहे. भू-संपादनची प्रक्रिया फार रखडलेली नाही. त्याचा कामावर कोणताही विपरहत परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.