महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसचा सोमवारी रास्ता रोको

0

मुंबई । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या दुरावस्थेबाबत प्रशासनाला जाग आणण्यासाठी या महामार्गावर पनवेल ते सावंतवाडी दरम्यान 27 नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने 11 ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. आ.भाई जगताप म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला असून या महामार्गावर अपघात होऊन दरवर्षी जवळपास 1 हजार प्रवासी मृत्यूमुखी पडतात. या महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्याचप्रमाणे दुसर्‍या टप्प्याचे जमीन अधिग्रहणाचे काम ही व्यवस्थित सुरु नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. ज्यांची जमीन, घरे व दुकाने उध्वस्त होत आहेत त्यांना दिला जाणारा मोबदला समान न्यायाने न देता कमी जास्त रक्कम देऊन अन्याय केला जात आहे असे आ. भाई जगताप म्हणाले.

दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा
या रस्त्याच्या खड्डे दुरुस्तीचे कंत्राट मिळालेले कंत्राटदार व अधिकार्‍यांच्या संगनमताने खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरु आहे. काँग्रेस पक्षाने वारंवार याचा पाठपुरावा केला पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदर महामार्गाच्या दुरुस्तीचे काम आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगत हात झटकले. त्यामुळे सरकारला व प्रशासनास जाग आणण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने 27 नोव्हेंबर रोजी पनवेल ते सावंतवाडी दरम्यान 11 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात खा. हुसेन दलवाई, आ. हुस्नबानो खलिफे, माजी आ. माणिक जगताप, विश्‍वनाथ पाटील, आर. सी. घरत, माजी आमदार मधुसेठ ठाकूर, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास सावंत, माजी आमदार रमेश कदम यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कोकणातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आमदार भाई जगताप यांनी दिली.