वरणगाव। चौपदरीकरण रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाची मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली ते धुळे जिल्ह्यातील फागणेपर्यंत दुरवस्था झाली आहे. प्रामुख्याने दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्या खचल्याने अपघात वाढले आहेत. त्यामुळे किमान पावसाळ्यापूर्वी साइडपट्ट्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होती. याची दखल घेत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने वरणगाव ते भुसावळ दरम्यान साइटपट्ट्या दुरुस्त केल्या. त्यात काटेरी झाडेझुडुपे काढल्याने बर्यापैकी दिलासा मिळाला आहे.
गाजावाजा होवूनही वर्षभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईना
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते महामार्गाच्या चौपदरीकरणाचे उद्घाटन झाले होते. मात्र, मोठा गाजावाजा होवूनही वर्षभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. दुसरीकडे महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याने अपघात वाढले. दीड ते दोन फूट खचलेल्या साइडपट्ट्या, जागोजागी वाढलेल्या काटेरी झुडुपांमुळे अनेक वाहनचालक जायबंदी झाले. काहींच्या जीवावर बेतले. याविषयी सर्वसामान्यांमध्ये वाढलेला आक्रोश पाहता प्राधिकरणाने चिखली ते फागणेदरम्यान साइडपट्ट्या दुरुस्ती, काटेरी झुडुपे काढण्याचे काम हाती घेतले आहे. वरणगाव ते भुसावळदरम्यान साइडपट्ट्या भरल्याने अपघाताचा धोका टळला आहे. पहिल्या टप्प्यात साइडपट्ट्यांवरील काटेरी झुडुपे काढत आहोत. साइडपट्ट्यांच्या खोलीचे मोजमाप सुरू आहे. लवकरच मुरूम टाकून साइडपट्ट्या भरु खड्डेही बुजवण्यात येणार आहे.