भुसावळ। जळगाव महामार्गावर भुसावळ ते जळगाव तसेच महामार्गच्या इतर ठिकाणी साईडपट्टी दरम्यान निकृष्ट दर्जाचा मुरुम शासनातर्फे टाकण्यात आलेला आहे. यामुळे अपघात रोखण्याऐवजी अपघात वाढण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली असून यासंदर्भात धुळे येथील राज्यमहामार्ग प्रकल्प प्रमुख अरविंद काळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
उद्देश चांगला मात्र काम चुकीचे
पावसाळा सुरु झालेला असून या साईडपट्टी वरुन अपघात होवू नये असा उद्देश प्राधिकरणाचा दिसत आहे म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजुस मुरुम टाकण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरु आहे. उद्देश चांगला आहे परंतु या ठिकाणी टाकलेला हा मुरुम अपघात रोधक नसून अपघाताला आमंत्रण देणारा आहे.
अपघाताची जबाबदारी अधिकार्यांवर?
आधीच महामार्गावर होत असलेले अपघात जास्त असून या निकृष्ट कामाने मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता आहे. याची आपण नोंद घ्यावी. या मार्गावर कोणत्याही ठिकाणी या मुरुमामुळे अपघात झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी
आपल्यावर येईल.
कठोर कारवाई करा
आपण स्वत: संपूर्ण परिसरात भ्रमंती करून या विषयाची सखोल चौकशी करावी. तसेच या विषयी कंत्राटदाराच्या ही बाब लक्षात आणून द्यावी. तसेच योग्य काम न केल्यास त्यांची बिले काढू नये तसेच कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन, प्रा. धीरज पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, नवी दिल्ली, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, विभागीय कार्यालय, धुळे, कार्यकारी अभियंता, जळगाव यांना निवेदनाच्या प्रती रवाना करण्यात आल्या आहेत.