आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक
ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आग लागल्याचा आरोप
नवापूर : शहरातील महामार्गालगतवरील साई संगम हॉटेलजवळ रफीकशा शब्बीर शाह यांच्या मालकीच्या भंगारच्या गोडावुनला आग लागून खाक झाल्याची घटना रविवारी, 21 रोजी दुपारी बारा वाजता घडली. आगीत टायर, बॉटल, प्लास्टिक सामान व इतर भंगार साहित्य जळून 80 ते 90 हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
आगीचा डोंब उसळून धुरांचा लोट सर्वत्र पसरला होता. त्यामुळे शहरी भागात धूर येऊन घबराट निर्माण झाली होती. नेमके काय झाले म्हणून लोक आग लागली त्या दिशेने घटनास्थळी धावत होते. महामार्गावरील वाहने आगीचा डोंब पाहून ठप्प झाली होती. भंगार गोडावुन लगतची दुकाने व हॉटेलमधील लोक ओरडत धावून रस्त्यावर आले होते. ‘पाणी डालो’ असे ओरडत लोक पळत होते. पण तीव्र उन्हाळा असल्याने पाणीच नसल्याने नाईलाज होत होता.
गोडावुनजवळ खड्डे खोदून इलेक्ट्रीक पोल टाकण्याचे काम महामार्गवाले करत आहे. ठेकेदाराने वीज सप्लाय बंद न करता जेसीबी लावून काम सुरु केले होते. सिमेंटच्या खांबाला जेसीबीने धडक दिल्याने वीज तारांमध्ये घर्षण होऊन जवळ पडलेल्या सुकलेल्या गवतात ठिणग्या पडून आग पसरुन भंगार गोडावुनपर्यंत जाऊन पोहोचली होती.
माजी नगरसेवक फारुखभाई शाह यांनी अग्निशामक बंब तातडीने मागवून पाण्याचा मारा केल्यामुळे आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला.ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आग लागल्याचा आरोप माजी नगरसेवक फारुख शाह यांनी केला आहे. वीज सप्लाय बंद न करता काम करणे चुकीचे असून ते गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
आग लागताच वीज पोल टाकण्याचे काम करत असलेले मजूर व जेसीबी तेथून चालते झाले. दूरपर्यंत आगीच्या धुराचा लोट जात असल्याचे पाहून आग मोठी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. वेळेवर अग्निशामक बंब आल्याने आग शमली. या गोडावूनसमोर पेट्रोल पंप व अनेक दुकाने आहेत. आगीमुळे अनेक ग्राहकांनी याभागात येणे टाळले होते. आग विझल्यावर लोक येऊ लागली होते. महामार्गावर वीज पोल टाकण्याचे काम करत असतांना त्यांची परवानगी वीज वितरण कंपनीकडून घेतली होती का? असा प्रश्न या आगीमुळे उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे परवानगी घेतली नसल्याचे चर्चिले जात आहे. तसे नसल्यास तर ती गंभीर बाब असून त्याची चौकशीची मागणी केली जात आहे.