महामार्गावरील मद्यधुंदी बंद

1

धुळे । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 एप्रिलपासून महामार्गावरील 500 मिटरच्या आतील मद्यविक्री दुकाने बंद करण्यात आली आहेत. यामुळे मद्यविक्री व बियरबार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. धुळे जिल्ह्यातील सुमारे 350 दुकानांपैकी साधारणतः 260 मद्यविक्री दुकाने, बियरबार, बियरशॉपी, देशी दारु दुकाने बंद झाली असून धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा येथील एकत्रित मिळून सुमारे 77 मद्यविक्रीची दुकाने बचावली आहेत. या दुकानांना कुठलाही धोका नसल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धुळे कार्यालयाने दिली. 1 एप्रिल पासून 500 मीटरच्या आत मद्यविक्रीची दुकाने सुरु असल्याची माहिती नागरिकांनी उत्पादन शुल्क विभागाला कळवावी, असे आवाहन अधिकार्‍यांनी केले आहे.

गावांसाठी 220 मीटर अंतरावर परवानगी
दि. 15 डिसेंबर 2016 रोजी दारु पिऊन वाहन चालविण्यामुळे होत असलेल्या अपघातांवर आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावलगतच्या मद्यविक्रीवर मर्यादा घातली होती. ज्यांना मद्यविक्रीचे परवाने मिळाले असतील आणि मद्यविक्रीची जी दुकाने मर्यादेच्या आतमध्ये आहेत त्यांना मात्र, 1 एप्रिलपासून मद्यविक्री व्यवसाय बंद करावा लागणार आहे, असे आदेश न्यायालयाने दिला. यावेळी देशातील राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून किमान 500 मीटरपर्यंत व 20 हजार लोकसंख्या असलेल्या गावांसाठी 220 मीटर अंतरावर मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे.

बंद दुकानांवर ‘वॉच’साठी पथक
धुळे जिल्ह्यातील शिदंखेडा तालुक्यातील 27,साक्री तालुक्यातील 10, शिरपूर तालुक्यातील 30 व धुळे तालुक्यातील 06 इतकी मद्यविक्रीची दुकाने बचावली असून त्यांना कुठलाही धोका नाही, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धुळे कार्यालयाने दिली. आजपासून जिल्ह्यासह शहरातील बंद असलेली मद्यविक्रीच्या दुकानांवर लक्ष ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग व पोलीस विभाग यांनी विशेष मोहिम आखली आहे. ज्या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशानुसार मर्यादेच्या आतील मद्यविक्री दुकाने, बियरबार सुरु असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले आहे. वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. आज कार्यालयात सर्वच अधिकार्‍यांना उपस्थितीचे आदेश असून आम्ही अलर्ट आहोत. मर्यादेच्या आतील मद्यविक्रीची दुकाने सुरु असल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती कळवावी, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ.मनोहन अंचुळे यांनी केले आहे.

शहरातील चार दुकाने बचावली
या आदेशानंतर काल रात्री मध्यरात्री 12 वाजेपासूनच धुळे जिल्ह्यातील मर्यादेच्या आतमध्ये असलेले सर्व दारु दुकाने, बियरबार, वाईनशॉप, बियरशॉपी, देशी दारुची दुकाने अशी एकूण 260 दुकाने बंद करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सुमारे 350 मद्यविक्रीची दुकाने आहेत. यापैकी जिल्ह्यातील चारही तालुक्यातील 77 बियरबार, वाईनशॉप, बियरशॉपी, देशी दारुची दुकाने बचावली आहेत. यामुळे जिल्ह्यातून केवळ 77 व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. त्यात धुळे शहरातील चार दुकाने बचावली आहेत. यात स्टेशनरोडवरील आणि फााशीपुालवरील प्रत्येकी एक असे दोन देशी दारुचे दुकान व नकाणेरोडवरील कुणाल बियरबार व जयहिंद चौकातील नरसिंहा बियरबार यांचा समावेश आहे.